

बुलढाणा : मतदार यादीच्या फेरतपासणीमुळे (एसआयआर) बुलढाणा जिल्ह्यात ताटातूट झालेल्या माय-लेकरांची तब्बल २४ वर्षांनी गाठभेट झाली. घर सोडून गेलेला मुलगा पुन्हा आपल्या कुटुंबात परतला. बुलढाण्यातील मलकापुरात घडलेल्या घटनेने सरकारी कामाचा मानवी चेहरा समोर आला आहे. आई आणि लेकराची ही भेट आनंदाश्रूंचा बांध फुटणारी अन् बीएलओंच्याही डोळ्यात पाणी आणणारी होती.
सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील केडगावचा नवनाथ धोंडीबा गायकवाड. कौटुंबिक वादानंतर तब्बल २४ वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेला. अनेक गावांमध्ये भटकंती करत तो बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात स्थायिक झाला. इथे संसारही थाटला, पण मागे आई, भाऊ आणि बहीण मात्र वर्षानुवर्षे त्याची वाट पाहत राहिले. २४ वर्षांपासून लेकाच्या शोधात असलेल्या आईसाठी अखेर तो दिवस उजाडला. दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी फेरतपासणी म्हणजेच एसआयआर प्रक्रियेदरम्यान बीएलओ नीता भोंबे आणि सहाय्यक बीएलओ अनिल भोंबे माहिती संकलनासाठी नवनाथ यांच्या घरी पोहोचले. पडताळणी करताना नवनाथचे नाव सोलापूरच्या मतदार यादीशी जोडलेले असल्याचे समोर आले. त्यानंतर करमाळा येथील बीएलओंशी त्यांनी संपर्क केला. त्यानंतर हरवलेल्या मुलाचा मूळ पत्ता, कुटुंब याची माहिती मिळाली.
४०० किलोमीटरचा प्रवास करून गाठले घर
मुलगा जिवंत असल्याचे कळताच आई, भाऊ, बहीण आणि नातेवाईकांनी एका क्षणाचाही विलंब केला नाही. जवळपास ४०० किलोमीटरचा प्रवास करून ते थेट मलकापुरात पोहोचले. सकाळी अचानक मुलासमोर उभे राहिले. २४ वर्षांनंतर आईने आपल्या लेकराला मिठी मारली, आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. भाऊ, बहीण आणि उपस्थित प्रत्येकाच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या..
सुनेला दिले सासूबाईने मंगळसूत्र
नवनाथ यांच्या पत्नीला सुरुवातीला नेमके काय घडत आहे, हेच समजले नाही. पण सत्य समजताच वातावरण आणखी भावनिक झाले. आईने आपल्या सुनेच्या गळ्यात स्वतःचे सोन्याचे मंगळसूत्र घातले आणि प्रेमाने म्हणाली.. ‘आता इथे नका राहू... आमच्यासोबत घरी चला..’ नवनाथ यांनीही लवकरच गावी येण्याचे आश्वासन दिले. या भेटीतील आणखी एक हळवा पैलू म्हणजे नवनाथ यांचे धाकटे भाऊ अशोक... ते डायलिसिससाठी रुग्णालयात दाखल होते. पण उपचार पुढे ढकलून त्यांनी आधी भावाला भेटणे पसंत केले.
‘बीएलओ’ची संवेदनशीलता
एसआयआर प्रक्रिया एका कुटुंबासाठी मात्र आयुष्यभर विसरता न येणारा क्षण घेऊन आली. बीएलओच्या सतर्कतेमुळे एका आईला तिचा हरवलेला मुलगा, एका भावाला त्याचा मोठा भाऊ आणि एका बहिणीला तिचा लाडका भाऊ २४ वर्षांनी परत मिळाला. सरकारी कागदपत्रांची पडताळणी आणि त्यातून जुळले तुटलेले नाते. मलकापुरातील या घटनेने मानवी संवेदनशीलतेमुळे दुभंगलेले घर पुन्हा एकत्र आले.