सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ची स्थापना; बसवराज तेली ‘एसआयटी’चे प्रमुख; १० सदस्यांचा समावेश

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी १० सदस्य असलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. गुन्हा अन्वेषण विभागाचे (सीआयडी) उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे एसआयटीचे प्रमुख असतील.
संतोष देशमुख, वाल्मिक कराड (डावीकडून)
संतोष देशमुख, वाल्मिक कराड (डावीकडून)
Published on

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी १० सदस्य असलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. गुन्हा अन्वेषण विभागाचे (सीआयडी) उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे एसआयटीचे प्रमुख असतील. दरम्यान, देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणातील मुख्य संशयित आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा साथीदार वाल्मिक कराड याची बुधवारी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कराड मंगळवारी पुणे सीआयडीसमोर शरण आला होता.

गृह मंत्रालयाने बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये पोलीस उपायुक्त अनिल गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहाय्यक उपनिरीक्षक तुळशीराम जगताप आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज वाघ, चंद्रकान्त काळकुटे, बाळासाहेब अहंकारे आणि संतोष गित्ते आदींचा समावेश आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात हत्येसह चार गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. यात अपहरण आणि हत्या, दोन कोटी रुपयांची खंडणी, ॲट्रॉसिटी आणि मारहाण अशा चार गुन्ह्यांची नोंद आहे. या चार गुन्ह्यात पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडी कार्यालयात मंगळवारी शरण आला. त्याच्याशिवाय चार गुन्ह्यांत ९ संशयित आहेत. यापैकी चार जण अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

खंडणीप्रकरणी चौकशीसाठी तीन जणांना बोलाविले

दरम्यान, देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणीप्रकरणी सीआयडीने तपास सुरू केला असून तीन जणांना चौकशीसाठी बोलाविले आहे. मात्र, चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेल्यांची नावे पोलिसांनी सांगितली नाहीत. दरम्यान, या प्रकरणातील फरारी आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी गावकऱ्यांना पाण्याबाहेर येण्याची विनंती करून त्यांच्याशी संवाद साधला. आपण गावकऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी या हत्येप्रकरणाचा योग्य तपास व्हावा आणि आरोपींना लवकर अटक व्हावी, अशी मागणी केल्याचे काँवत यांनी सांगितले. फरार आरोपींना अटक करण्यासाठी १०० टक्के प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे, असे काँवत यांनी गावकऱ्यांना सांगितले. देशमुख हत्याप्रकरणी आतापर्यंत प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे आरोपी अद्याप फरार आहेत.

अन्यथा मराठे रस्त्यावर

मनोज जरांगे या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याच्या आरोपाबाबत म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा या हत्या प्रकरणात सहभाग आहे की नाही हे लवकरच सिद्ध होईल. आता चौकशी सुरु झाली आहे. काही आरोपी फरार आहेत. त्यांचे सीडीआर घेतले जातील. कॉल डिटेल्सवरुन सगळे समोर येईल. कोणी खंडणी मागितली, कोणी मागायला लावली, कोणी फोन करायला लावले, आरोपी कोणी फरार केले, आरोपींना कोण सांभाळते हे सगळे चौकशीतून पुढे येईल. या प्रकरणातील आरोपींना मोक्का लागणार आहे. ३०२ चा गुन्हाही लावला जाऊ शकतो. सरकारने हे केले नाही तर मराठे पुन्हा रस्त्यावर येतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

...तर महाराष्ट्र बंद पाडू

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का? त्याबद्दल मला माहीत नाही. मला एवढेच माहीत आहे की या प्रकरणात जे जे येतील मग मंत्री असो की आमदार असो की आणखी कोणी असो कोणालाही सोडायचे नाही. अन्यथा आम्ही महाराष्ट्र बंद पाडणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. ते म्हणाले, आरोपींनी कोणा-कोणाला फोन केले. आरोपींना कोणी पळवून लावले. कोणी आसरा दिला, हे सर्व बाहेर येणार आहे.

कराडला १४ दिवसांची पोलीस कोठडी

देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीप्रकरणातील मुख्य संशयित आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा साथीदार वाल्मिक कराड याची बुधवारी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कराड मंगळवारी पुणे सीआयडीसमोर शरण आला होता. कराड याची प्राथमिक चौकशी करून त्याला बीडमधील सीआयडी पथकाच्या स्वाधीन करण्यात आले होते.

गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

देशमुख हत्या प्रकरणातील फरारी आरोपींना लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील एका गावात काही जणांनी बुधवारी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी मस्साजोगमधील अनेक गावकरी तलावात उतरले आणि जलसमाधी आंदोलनाचा एक भाग म्हणून कंबरेइतक्या पाण्यात उभे राहिले. देशमुख यांची हत्या होऊन २३ दिवस उलटले तरी अद्याप तीन आरोपी फरार आहेत, पोलीस प्रशासन काय करीत आहे, आरोपींना फासावर लटकवावे या मागणीसाठी निदर्शनाचा एक भाग म्हणून गावकरी पाण्यात उतरले आहेत, असे एका गावकऱ्याने सांगितले.

जरांगेंचा इशारा

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली असली तरी तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. काही दिवसांत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे. सगळ्या आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही तर मराठे रस्त्यावर येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in