उद्धव ठाकरे गटाला धक्का; भाजपच्या दुसऱ्या यादीत विद्यमान खासदार कलाबेन डेलकर यांचे नाव

डिसेंबर २०२३मध्ये कलाबेन डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो सोशल मीडियावर टाकला होता.
उद्धव ठाकरे गटाला धक्का; भाजपच्या दुसऱ्या यादीत विद्यमान खासदार कलाबेन डेलकर यांचे नाव

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने बुधवारी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अशा मोठ्या नावांना उमेदवारी मिळाली. पण, या यादीतील एक नाव आता चर्चेचा विषय ठरत आहे.

भाजपच्या यादीत दादरा-नगर हवेलीच्या विद्यमान खासदार कलाबेन डेलकर यांना देखील लोकसभेची उमदेवारी देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे डेलकर या ठाकरे गटाच्या विद्यमान खासदार आहेत. ठाकरे गटाच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढवून विजयी झाल्यात. त्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला होता. असे असताना आणि अद्याप त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्याचे कोणतेही वृत्त नसतानाही भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे हा ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे.

"मला उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानते. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानते. दादरा-नगर हवेलीची जागा आपण जिंकणार आहोत", अशी प्रतिक्रिया डेलकर यांनी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर माध्यमांशी बोलताना दिली आहे

कोण आहेत कलाबेन डेलकर?

कलाबेन डेलकर या दादरा-नगर हवेलीच्या माजी खासदार मोहर डेलकर यांच्या पत्नी आहेत. मोहर डेलकर यांनी २२ फेब्रुवारी २०२१ मध्ये नरीमन पॉइंट येथील 'सी ग्रीन साऊथ' हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी मोहन डेलकर यांनी गुजराती भाषेत चिठ्ठी लिहली होती. डेलकरांच्या आत्महत्यानंतर दादरा-नगर हवेलीची जागारिक्त झाल्यानंतर २०२२मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ठाकरे गटाने कलाबेन डेलकर तिकीट दिले. या पोटनिवडणुकीत भाजपचा महेश गावित यांचा पराभव त्यांनी केला होता.

डेलकरांची शहांसोबत भेट

डिसेंबर २०२३मध्ये कलाबेन डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो सोशल मीडियावर टाकला होता. पंतप्रधान मोदींसोबतची ती भेट शिष्टाचार आणि शुभेच्छासाठी होती, असे त्यावेळी डेलकर यांच्याकडून सांगण्यात आले. डिसेंबर २०२३ मध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा दादरा-नगर हवेलीचा दौरा झाला होता. त्यावेळी डेलकर यांनी शहांची भेट घेतली होती. त्यानंतर डेलकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. अद्यापही डेलकरांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला नाही तरी, देखील भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in