
राज्यामध्ये गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे, रायगड इत्यादी भागांना तर पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळं कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. सातत्यानं कोसळणारा पाऊस आणि कोयना धरणात वाढलेली पाण्याची आवक पाहता कोयना धरणाचे सहा दरवाजे दीड फूटांनी उचलण्यात आले आहेत. सध्या ११ हजार क्युसेक वेगानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कोयना धरणात पाण्याची आवक आणखी वाढल्यास हा विसर्ग २० हजार क्युसेक पर्यंत वाढवला जावू शकतो.
कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले-
गेल्या काही तासांमध्ये राज्यामध्ये पावसाची तुफान फटकेबाजी पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु असून येथील कोयना धरणामध्येही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरूवारी संध्याकाळपर्यंत कोयना धरणात सुमारे ७८ टीएमसीवर साठा झाला होता. तीन दिवसांपूर्वी धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करून १ हजार ५० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु सध्या सुरु असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक ८६ हजार क्यूसेकवर पोहोचली. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने दरवाजातून विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सर्व सहा दरवाजे दीड फुटांनी उचलून ११ हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच रात्रीपर्यंत त्यामध्ये आणखी वाढ करुन २० हजार क्यूसेकपर्यंत नेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
कोयनेसह उरमोडी, वीर, कण्हेर धरणांतूनही पाण्याचा विसर्ग?
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोयना, वीर, निरा, उरमोडी या धरणात पाणी येण्याचा ओघ अधिक असल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.