कराडमध्ये मांडुळ साप तस्करांना अटक; १ कोटी रुपये किमतीचे मांडुळ जप्त

तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी वरील तिघांनाही ताब्यात घेतलं. यावेळी त्यांच्याकडील बॉक्समध्ये मांडुळ आढळून आले.
कराडमध्ये मांडुळ साप तस्करांना अटक; १ कोटी रुपये किमतीचे मांडुळ जप्त

कराड : मांडुळ सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या रायगड जिल्ह्यातील तीन तस्करांना कराड तालुक्यातील तळबीड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. या तस्करांकडे १ कोटी १० लाख रुपये किंमतीचा मांडुळ साप आढळून आला. तसेच तळबीड पोलिसांनी मांडुळाला वन्यजीव विभागाच्या ताब्यात दिलं आहे. रुपेश अनिल साने (रा. आड, ता. पोलादपूर), अनिकेत विजय उत्तेकर आणि आनंद चंद्रकांत निकम (दोघे रा. कापडखुर्दे, ता. पोलादपूर, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पुणे-बंगळुरू महामार्गावरील तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वराडे, ता कराड गावाच्या हद्दीतील महामार्गालगतच्या एका हॉटेलच्या आवारात शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

शनिवारी पहाटेच्या सुमारास तीन जण मोटारसायकलवरुन पुणे-बंगळुरू महामार्गावरील तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वराडे, ता कराड गावाच्या हद्दीतील महामार्गालगतच्या जय शिवराय हॉटेलच्या आवारात येवून थांबले. यावेळी हॉटेलच्या आवारामध्ये असलेल्या लोकांना त्यांच्याजवळ असलेल्या एका बॉक्समध्ये मांडुळ असल्याचे दिसून आल्याने त्यांनी याबाबतची माहिती तळबीड पोलिसांना दिली. तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी वरील तिघांनाही ताब्यात घेतलं. यावेळी त्यांच्याकडील बॉक्समध्ये मांडुळ आढळून आले. या तिघा संशयितांतील आनंद चंद्रकांत निकम याला दहा दिवसांपूर्वी त्याच्या शेतात काम करताना मांडूळ सापडले होते व ते १ कोटी १० लाख रुपये किंमतीला विक्रीसाठी घेवून जात होतो, अशी कबुली संशयितांनी दिली. पोलिसांनी याबाबतची माहिती कराड वन विभागाच्या दिली असता वन विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाने सदर मांडुळाची किंमत १ कोटी १० लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, वरील तिन्ही संशयितांवर वन्यजीव प्राणी अधिनियमान्वये तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं मांडुळ कराड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.वन विभागाने सदर मांडुळ नैसर्गिक पण सुरक्षित स्थळी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. तळबीड पोलिसांनी ही कारवाई केली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in