"...तर मी शिवसैनिक आणि अँटी करप्शनच्या प्रमुखांसमोर जाहीरपणे गळफास घेईन", सुधाकर बडगुजरांचा थेट इशारा

बडगुजर कंपनीत खोटे कागदपत्र दाखल केल्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरु आहे.
"...तर मी शिवसैनिक आणि अँटी करप्शनच्या प्रमुखांसमोर जाहीरपणे गळफास घेईन", सुधाकर बडगुजरांचा थेट इशारा
Published on

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेला सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ शिवसेना शिंदे गटाने उघड केला. यानंतर या पार्टीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनात देण्यात आले. याच बरोबर बडगुजर कंपनीत खोटे कागदपत्र दाखल केल्यावरुनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरु आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी शिंदे गटाला आव्हान दिले आहे. "शिवसैनिकांवर खोट्या केस दाखल करणं चुकीचं आहे. जर हे कागदपत्र चुकीचे असतील तर शिवसैनिक आणि अँटीकरप्शनच्या अध्यक्षांसमोर जाहीरपणे आत्महत्या करेन. जाहीरपणे गळफास घेईन" असा इशारा बडगुजर यांनी दिला आहे.

सुधाकर बडगुजर म्हणाले, माझ्या दोन्ही बंगल्यावर एसीबीने छापा टाकला. अँटी करप्शनने गुन्हे दाखल केले. फॉर्जरी (खोटे कागदपत्र सादर केल्यामुळे) म्हणून गुन्हा दाखल केला. ५३ वर्षात माझ्याविरोधात साधी एनसीही नाही. त्यामुळे हा विषय माझ्या जिव्हारी लागला. मी बडगुजर कंपनीची स्थापना केली. मला २००६ साली निवडणूक लढवायची होती, त्यामुळे मी कंपनीतून निवृत्त झालो. सगळे सरकारी पुरावे माझ्याकडे आहेत. २०११ लाच कोर्ट पिटीशनमध्ये ऑर्डर आली. अँटी करप्शनने मांडलेले मुद्दे कोर्ट ऑर्डरमध्ये देखील आहेत.

माझ्याविरोधात २०१४ ला तक्रार करण्यात आली होती. मग अँटी करप्शनला माझ डीड तपासण्यात दहा वर्षे का लागले? अन्याय करण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्राणा कोणाच्या दबावाखाली काम करते. पोलिसांनी थोडं संयम ठेवला पाहिजे. पडताळणी केली पाहिजे. मागच्या प्रकरणातही म्युनिसिपल कामगार सेनेचे कार्यालय सील केलं. आम्ही या विरोधात हायकोर्टात गेल्यावर न्यायालयाने पोलिसांना माघार घेताय की कारवाई करु, असा इशारा दिला. त्यावर पोलिसांनी माघार घेतली. तुम्हाला माघार घ्यायची होती तर मग कारवाई का केली. बदनामी का केली? असा सवाल बडगुजर यांनी विचारला आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की चुकीचे गुन्हे दाखल करुन नका. या प्रक्रियेतून मला जावेच लागेल. परंतु. अशी अन्यायकारक कारवाई कोणत्याही सिवसैनिकांवर करु नका, अशी विनंतीही बडगुजर यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in