नांदेड : अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर काँग्रेसकडून हालचाली वाढल्या आहेत. पक्षश्रेष्ठीकडून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. याच अनुषंगाने मंगळवारी काँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांनी नांदेड दौरा करत कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अनिल पटेल, तुकाराम रेंगे यांच्यासह इतर पक्ष निरीक्षकानी मतदारसंघनिहाय बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. दरम्यान, नांदेडमधून काँग्रेस उमेदवाराला निवडून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
नांदेडमधील काँग्रेस आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार पक्षनिरीक्षकांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षनिरीक्षकांनी विधानसभानिहाय सर्वांची मते व सूचना समजून घेतल्या. काही पदाधिकाऱ्यांनी शहराची कॉंग्रेस समिती बरखास्त करून निष्ठावंताना संधी द्यावी, अशी मागणी केली. तसेच आगामी लोकसभेसाठी पक्षातील ताकदवान उमेदवार शोधा, याशिवाय वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्या, अशीही मागणी करण्यात आली. हा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे दिल्यानंतर पुन्हा एकदा वरिष्ठ नेते नांदेडला भेट देणार आहेत, त्यानंतरच नव्या समित्यांविषयी ठोस निर्णय होईल, असे कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
अशोक चव्हाणांच्या दौऱ्यानंतर चित्र स्पष्ट होणार
कॉँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. आजही ते अशोक चव्हाण यांना आपले नेते मानतात. पक्षांतरानंतर अशोक चव्हाण अजून नांदेडला आले नाहीत. ते आल्यानंतर बरेच जण त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौऱ्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.