
मुंबई : करुणा शर्मा माझ्या पत्नी नाहीत. आम्ही लग्नच केले नाही. मी पोटगी देण्याचा संबंध नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात केला. याची दखल घेत सत्र न्यायालयाने, मग करूणा त्या मुलांची आई की नाही, त्या मुलांचे नेमके वडील कोण? ती त्या मुलांची आर्ई आहे की नाही,असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा - मुंडे यांच्या विवाहाचे पुरावे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
४ फेब्रुवारीला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने करुणा मुंडे यांची अंतरिम याचिका अंशतः मान्य केली होती. त्यांना दरमहा १.२५ लाख रुपये तसेच त्यांच्या मुलीला दरमहा ७५ हजार रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश दंडाधिकारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिले होते. करुणा मुंडे यांनी २०२० मध्ये धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. त्यावर न्यायालयाचा अंतिम निर्णय होणे बाकी आहे. तोपर्यंत न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निर्णयाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. या आव्हान याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांच्यासमोर शनिवारी सुनावणी झाली. यावेळी मुडे यांच्यावतीने करूणा आणि धनंजय मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न झालेले नाही. राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत. मात्र करूणाच्या त्या दोन मुलांना मुंडे यांनी स्विकारले आहे. ज्या व्यक्तीबरोबर विवाहच झाला नाही तर पोटगी देण्याचा प्रश्नुच येत नाही, असा दावा करताना करुणा या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. वर्षाला १५ लाखाच्या जवळपास उत्पन्न आहे. स्वतःचे व्यवसाय आहेत त्यांना माझ्या पैशांची
गरज नाही, असा दावा मुंडे
यांच्या वकिलांनी केला.
याचिकेची सुनावणी ५ एप्रिलला निश्चिात केली.