ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन; वंचित आणि कष्टकऱ्यांचा आवाज हरपला

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी आणि श्रमिकांचे नेते सर्वांचे लाडके बाबा अर्थात डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (वय ९५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देणारा एक ध्येयवादी लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन; वंचित आणि कष्टकऱ्यांचा आवाज हरपला
Published on

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी आणि श्रमिकांचे नेते सर्वांचे लाडके बाबा अर्थात डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (वय ९५) यांचे सोमवारी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त असलेल्या बाबा आढाव यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देणारा एक ध्येयवादी लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यामागे पत्नी शीला आढाव, असीम आणि अंबर हे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि असंघटित कामगारांचे आवाज मानले जाणारे, ‘सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर’ ही प्रार्थना जनमानसात रूढ करणारे, समता-न्याय-बंधुत्वाचा जागर करणारे, घरोघरी संविधान पोहोचवण्याचा संकल्प केलेले, कष्टकऱ्यांचे नेते म्हणून बाबा आढाव सर्वपरिचित होते. त्यांच्यावर फुफ्फुसात बिघाड झाल्याने पूना हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. अखेर सोमवारी रात्री ८.२५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१ जून १९३० रोजी पुण्यात जन्मलेले डॉ. बाबा आढाव यांचे आयुष्य संघर्षातून उभे राहिले. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. १९४९ मध्ये मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण झाल्यावर, त्यांनी वैद्यकाची पदवी घेतली. तीन महिन्यांचे असतानाच वडिलांचे छत्र हरपल्यावर आजोळीच लहानपण घालवल्यानंतर ते वयाच्या १२व्या वर्षी अर्थात १९४२ मध्ये राष्ट्र सेवा दलात दाखल झाले. रसायनशास्त्राची पदवी संपादन करून त्यांनी ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयातून १९५२ मध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी नाना पेठेतील घरी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. भाऊसाहेब रानडे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, आणि राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी सिद्धांतांनी बाबा प्रेरित झाले. राष्ट्र सेवा दलात भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, बापूसाहेब काळदाते यांच्यासह इतर समाजवादी नेत्यांसोबत त्यांनी काम केले.

साने गुरुजी आणि एस. एम. जोशी हे त्यांचे मार्गदर्शक असल्याने, ते ‘भारत छोडो’ चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय सहभागी होते. दलितांना पंढरपूर मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी १९४८ मध्ये झालेल्या आंदोलनात साने गुरुजींना बाबांनी मदत केली.

बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित आणि वंचितांसाठी वेचले. १९७०च्या दशकात पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. समाजवादी पक्षाचे सदस्य असलेल्या बाबांनी हमाल, रिक्षाचालक आणि कष्टकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी ‘रिक्षा पंचायत’ आणि ‘हमाल पंचायत’च्या माध्यमातून मोठे काम उभे केले. विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी राबवलेली ‘एक गाव एक पाणवठा’ ही मोहीम महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात अजरामर ठरली.

राज्यातील दुष्काळादरम्यान हमालांच्या हलाखीच्या परिस्थितीने व्यथित झालेल्या बाबांनी महागाई आणि अन्नधान्याच्या रेशनिंगविरुद्ध सत्याग्रह केला. त्यांनी तीन आठवडे तुरुंगवास भोगला आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या लेखन व कार्यांनी प्रेरित होऊन त्यांनी महाराष्ट्रातील संघटित आणि असंघटित कामगार चळवळीत सहभाग घेतला. डॉ. आढाव यांनी नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वयंरोजगार महिला संघटनेसाठी अरुणा रॉय आणि नर्मदा बचाओ आंदोलन आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी, पुनर्वसन परिषद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसोबत काम केले. आजवरच्या वाटचालीत त्यांना ५३ वेळा तुरुंगवास भोगावा लागला.

मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि देवदासी निर्मूलन परिषदेतही बाबा सामील झाले होते. १९८४ मध्ये त्यांनी गडहिंग्लज येथे पहिली देवदासी पुनर्वसन परिषद भरवली. १९८३ मध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेची स्थापना केली. त्यांच्या अभूतपूर्व सत्याग्रहामुळेच देशात प्रथमच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा करण्यात आला. बाबांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनापेक्षा सामाजिक सक्रियतेला प्राधान्य दिले. वयोमान वाढले तरी बाबांमधील कार्यकर्ता कधीच थकला नाही. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर, बिघडलेल्या राजकीय संस्कृतीविरोधात वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.

महान संघर्षयोध्दा हरपला -अजित पवार

समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य बाबा आढाव यांनी केले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला - हर्षवर्धन सपकाळ

असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कृतीशील समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला. डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी होते. असंघटित कामगार, वंचित, कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी श्रद्धांजली वाहिली.

logo
marathi.freepressjournal.in