
नववर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र दोन आगीच्या घटनांनी हादरला. एकीकडे नाशिकमधील घटना ताजी असतानाच दुसरीकडे सोलापूरच्या (Solapur) बार्शीमध्येही एका फटका फॅक्टरीमध्ये स्फोट झाला. ही घटना बार्शी तालुक्यातील पांगिरा गावाजवळ घडली असून यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना स्फोट झाला. यावेळी तिथे अंदाजे ४० कामगार काम करत होते.
बार्शीमध्ये झालेल्या या स्फोटामध्ये ३ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर जखमींना तातडीने उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि स्फोटानंतर झालेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये ६ ते ७ कर्मचारी गंभीर जखमी झाले. अद्याप आगीचे कारण कळू शकलेले नाही.