

सोलापूर : साखरपुड्यानंतर आपल्या शैक्षणिक कामासाठी एके ठिकाणी जाणाऱ्या नियोजित वधू - वराचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर घडली. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय शिनगारे (२५) व इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया चव्हाण (२३) यांचा गेल्या रविवारी (१५ फेब्रुवारी) साखरपुडा झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांत त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती.
नववधू अक्षया हिची रविवारी लातूर येथे महापारेषनची परीक्षा होती. या परीक्षेसाठी अक्षय व अक्षया हे कारने पहाटे वाशी येथून लातूरच्या दिशेने निघाले होते. सकाळी ६ च्या सुमारास रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार भरधाव वेगात थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढील भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. त्यात अक्षय व अक्षया या दोन्ही नियोजित वधू वराचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक अक्षय सिरसाट (२२) हा गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच रत्नापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल केले.