

सोलापूर : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने सोलापूर जिल्ह्याला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस न पडल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एक टन चाऱ्यासाठी ६ हजार रुपये मोजावे लागत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. आता जनावरे विकण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पाऊन नसल्याने शेतातील पिके करपून गेली असताना दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कारण पावसाअभावी चारा खरेदी करावी लागत आहे. यासाठी एक टनामागे ६ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
ज्या ठिकाणी थोडेफार पाणी आहे, तेथे शेतकरी मक्याचे पीक घेत आहेत. हे मकवान सहा हजार रुपये टन अशा दराने विकले जाऊ लागले आहे. सध्याच्या परिस्थितीत हाही चारा थोडासा असल्याने याचे भाव अजूनही वाढत जाणार आहेत.
सध्या पंढरपूरमधून सांगोला, मंगळवेढा, माढा, करमाळा अशा ठिकाणी हा चारा चढ्या भावाने विकला जात असून आता जनावरे सांभाळणे मुश्किल बनल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, उसाच्या चाऱ्याचे भावही पाच हजार रुपयेपर्यंत गेल्याने आता कारखान्याला ऊस घालून टप्प्याटप्प्याने पैसे घेण्यापेक्षा ऊस उत्पादक थेट चाऱ्यासाठी ऊस तोडू लागला आहे. सध्या आलेल्या चारा आणि मकवानाची विक्री होत असल्याने अनेक जणांना चाऱ्या अभावी हात हलवत परत जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने लक्ष घालून चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न केल्यास पशुधन जगवणे अवघड बनणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ही टँकर मागवावं लागत असल्याचे सांगत सरकार कधी जागे होणार? असा सवाल शेतकरी करीत आहे.
सप्टेंबरमध्ये ही अवस्था असल्याने पुढील वर्ष कसे जायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे बळीराजा दुबार संकटात सापडला असून सरकारच्या मदतीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहे.