सोलापूरमधील धक्कादायक घटना, मुलींच्या खोड्या काढतो व फोनवर Porn बघतो म्हणून बापानेच मुलाला संपवले

मुलगा फोनवर अश्लील व्हिडिओ बघायचा. शिवाय, तो मुलींच्या खोड्या काढतो अशी तक्रार शाळेतून वडिलांकडे आली होती.
सोलापूरमधील धक्कादायक घटना, मुलींच्या खोड्या काढतो व फोनवर Porn बघतो म्हणून बापानेच मुलाला संपवले
आरोपी पिता, विजय बट्टू

सोलापूरमधून खळबळजनक वृत्त आले आहे. येथे वडिलांनीच आपल्या १४ वर्षांच्या मुलाला शीतपेयातून विष पाजून कायमचं संपवल्याचा खुलासा झाला आहे. मुलगा फोनवर अश्लील व्हिडिओ बघायचा. शिवाय, तो मुलींच्या खोड्या काढतो अशी तक्रार शाळेतून वडिलांकडे आली होती. या रागातून मुलाला समज न देता बापाने मुलाला ठार केले. सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. विजय बट्टू असे वडिलांचे नाव असून ते शिंपीचे काम करतात.

स्वतःच केली मुलगा हरवल्याची तक्रार

आरोपी पित्याने सुरुवातीला मुलगा विशालचा खून केल्याची बाब पत्नीपासून तसेच पोलिसांपासून लपविली होती. १३ जानेवारी रोजी विजय आणि त्याची पत्नी मुलगा हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. काही दिवसांनंतर पोलिसांना मुलाचा मृतदेह दांम्पत्याच्या घराजवळील नाल्यात सापडला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये विशालच्या शरीरात सोडियम नायट्रेट नावाचे विष असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून विजयचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांची चौकशी सुरू केली.

पत्नीसमोर दिली कबुली, मुलाच्या कृत्यांमुळे त्रस्त होता

एकीकडे पोलीस तपास करत होते. दरम्यान, २८ जानेवारी रोजी विजयने पत्नीला मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. विशालच्या शाळेतून अनेक तक्रारी येत असल्याचे विजयने पत्नीला सांगितले आणि विशालचे घरातील वागणे आणि अश्लील चित्रपटांचे व्यसन यामुळेही तो वैतागला होता. त्यानंतर १३ जानेवारीला सकाळी त्यांनी मुलाला बाईकवर बसवून सोडियम नायट्रेट मिश्रित शीतपेय दिले. विशाल बेशुद्ध झाल्यावर विजयने त्याचा मृतदेह घराजवळील नाल्यात फेकून दिला.

पत्नीने पोलिसांना माहिती दिली

विजयचा कबुलीजबाब ऐकल्यानंतर त्याची पत्नी कीर्ती हिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी विजयला अटक करून २९ जानेवारी रोजी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in