

सोलापूर : जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या दोन मुलांसह पत्नीला विष देऊन स्वतःची जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेअर मार्केटमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून या घटनेमुळे संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. योगेश पाटील, माधुरी पाटील, अथर्व पाटील आणि शिवांश पाटील अशी मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
मृत योगेश पाटील हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. काही काळापासून ते शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करत होते, मात्र शेअर मार्केटमध्ये त्यांना सातत्याने प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आणि बाजारात टिकून राहण्यासाठी त्यांनी एक कोटी ऐंशी लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
पत्नी, दोन्ही मुलांना विष पाजून घेतला गळफास
कर्जाचा हा डोंगर आणि वसुलीसाठी होणारा मानसिक ताण यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड विवंचनेत होते. याच आर्थिक मानसिकतेतून योगेश पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बार्शी तालुक्यातील आपल्या हत्तीज या मूळ गावी असताना, आधी आपली पत्नी माधुरी आणि दोन्ही पोटच्या मुलांना विष देऊन संपवले. त्यानंतर योगेश पाटील यांनी स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
चिठ्ठीच्या आधारे पुढील तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. घटनेचा पंचनामा करत असताना पोलिसांना मृत मुख्याध्यापकाने लिहिलेली तब्बल बावीस पानांची चिठ्ठी सापडली आहे. पोलीस आता या चिठ्ठीच्या आधारे आणि तांत्रिक पुराव्यांवरून पुढील तपास करत आहेत.