सोलापूरच्या तरुणाला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून हत्या केल्याचा आरोप

प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून प्रेयसीच्या पित्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सोलापूर येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय आरोपी चैतन्य कांचन कांबळेने जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
सोलापूरच्या तरुणाला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून हत्या केल्याचा आरोप
Published on

मुंबई : प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून प्रेयसीच्या पित्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सोलापूर येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय आरोपी चैतन्य कांचन कांबळेने जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. आरोपीने हत्येचा कट रचल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नसल्याचे निरीक्षण न्या. अश्विन डी. भोबे यांनी नोंदवले आणि आरोपीला जामिनावर तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले.

७ ऑगस्ट २०२३ रोजी महेंद्र शहा यांच्यावर लाकूड आणि फायबर रॉडने हल्ला करण्यात आला होता. त्या घटनेच्या १६ महिन्यांनंतर ८ जानेवारी २०२५ रोजी शहा यांचा सेप्टिक शॉकमध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी चैतन्य कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चैतन्यचे शहा यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाला शहा यांचा विरोध होता. त्यातूनच चैतन्यने शहा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तथापि, आरोपांचे स्वरूप तसेच गुन्ह्यात आरोपी चैतन्यची कोणतीही भूमिका नसल्याचे लक्षात घेता त्याला सतत तुरुंगात ठेवण्याची गरज नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती भोबे यांनी नोंदवले.

न्यायालयाचे म्हणणे...

वैद्यकीय अहवालानुसार महेंद्र शहा यांच्या मृत्यूचे कारण ‘सेप्टिक शॉक’ आहे. गुन्ह्यात आरोप केल्याप्रमाणे महेंद्र शहा यांचा मृत्यू प्राणघातक हल्ल्यामुळे झाला हे सरकारी वकिलांना सिद्ध करावे लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. शहा यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून चैतन्य तुरुंगात होता.

logo
marathi.freepressjournal.in