

मुंबई : राज्यभरात रेल्वेचे जाळे विस्तारले जात असून सोलापूर तुळजापूर आणि धाराशिव रेल्वे मार्गाच्या सुधारीत आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. ३ हजार २९५ कोटींच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर, तुळजापूर याठिकाणी धार्मिक स्थळे असून धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे ब्रॅाडगेज रेल्वे मार्ग या प्रकल्पाच्या खर्चाच्या ५० टक्के हिस्सा म्हणजेच १ हजार ६४७ कोटी ८७ लाख रुपयांचा अधिकचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर शहर शक्तीपीठ रेल्वे मार्गाशी जोडले जाणार आहे. यामुळे विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी ५० टक्के आर्थिक सहभागाचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या भाविकांची सोय व्हावी यासाठी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्यात येत आहे. यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजे ४५२.४६ कोटी रुपयांच्या आर्थिक सहभागास १० फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. मात्र आता विविध कारणामुळे सदर प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ३ हजार २९५ कोटी ७४ लाख रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक सादर केले आहे. यामध्ये १ हजार ६४७ कोटी ८७ लाख रुपयांचा राज्य शासनाचा हिस्सा देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार सुधारित अंदाजपत्रकास आणि राज्य शासनाच्या हिस्सा देण्यास मान्यता आली. ही रक्कम टप्प्याटप्प्याने केंद्र सरकारला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.