Solapur : सोलापुरात निघाला नवरदेव मोर्चा; काय होत्या मागण्या?

सोलापूरमध्ये मोहोळ तालुक्यातील इच्छुक नवरदेवांनी शहरातील होम मैदानावर घोड्यावर बसून काढली वरात
Solapur : सोलापुरात निघाला नवरदेव मोर्चा; काय होत्या मागण्या?

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरु असताना अनेक मोर्चे, आंदोलने आपण बघतो आहोत. काही मागण्यांसाठी किंवा निषेध म्हणून अनेक मोर्चे, आंदोलने आपण पाहिले आहेत. पण, लग्नाला मुली मिळत नाही म्हणून सोलापूरमधील काही इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या अनोख्या मोर्चाची राज्यभर चर्चा झाली. क्रांती ज्योती परिषदे मार्फत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये, 'सोलापूर जिल्ह्यात गर्भ लिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी न झाल्याने आमच्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. आम्हाला लग्नासाठी मुलगी द्या' अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. बँड बाजा लावून, नवरदेवाच्या वेशात घोड्यावर बसून तरुणांनी होम मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. एवढे नवदेव नेमके कुठे चालले? असा प्रश्न बघणाऱ्यांना पडला होता.

क्रांती ज्योती परिषदेमध्ये सहभागी झालेले तरुण म्हणाले की, "लग्नाचे वय निघून जात आहे, वधू पक्षांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कायम रोजगार नाही, सरकारीही नोकरी नाही, मुलगा शेतकरीच आहे अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आमची लग्नाची वये उलटून जात आहेत. आम्हाला एखादी बायको द्या," अशी मागणी त्यांनी केली आहे. मोहोळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश बारसकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. देशातील फक्त केरळ राज्यात मुलींची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र राज्यात हजार पुरुषांमागे संख्या कमी होत चालली आहे. सोलापूर जिल्ह्यातील देखील परिस्थिती बिकट होत चालली आहे, असे मत यावेळी रमेश बारसकर यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in