
मुंबई : विजेची वाढती मागणी आणि राज्यातील जनतेला स्वस्त व जास्तीत जास्त वीजपुरवठा करण्याचे धोरण आहे. यासाठी हरित ऊर्जा विकासावर भर द्यावा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करा. शासकीय इमारतींचे सौरऊर्जाद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी महाऊर्जाने सर्वेक्षण करावे. वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात ऊर्जा विभागाच्या योजनांचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे (दूरदृश्यप्रणालीद्वारे), राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, अपर मुख्य सचिव वित्त ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव नियोजन राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. महाऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक डॉ. कांदबरी बलकवडे यांच्यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थाकडील वीज देयकाच्या थकबाकी वसुलीची योजना, भविष्यकाळातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीज वितरण यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. आगामी काळात हरित ऊर्जा विकासावर भर देण्याची गरज आहे. हायड्रोजन परिसंस्थेच्या विकासासाठी धोरणांतर्गत करण्यात येणारे संशोधन व विकास प्रकल्प, कौशल्य विकास यावरदेखील भर देण्यात यावा. यावेळी ऊर्जा विभागातील विविध प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्याचा आढावा त्यांनी घेतला.
पीएम सूर्यघरसाठी सर्वेक्षणाचे आवाहन
मोफत वीज योजनेमध्ये राज्यातील सर्व शासकीय इमारतींचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी महाऊर्जाने सर्वेक्षण पूर्ण करून या कामाला गती द्यावी. मॉडेल सोलर व्हिलेजसाठी महा ऊर्जा व महावितरण कंपनीने संयुक्तपणे काम करावे. महाऊर्जा, निर्मिती व पारेषण विभागातील प्रत्येक प्रकल्पाची कामे गती शक्ती योजनेच्या धर्तीवर विहित वेळेत पूर्ण करावीत गळती कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून वीज वापरासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.