कराड: कराड तालुक्यातील येरवळे येथील लष्करी जवान संतोष अण्णा जाधव यांचे गावी सुट्टीवर आले असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर येरवळे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतोष जाधव हे आसाममधील जोरहाट येथील मिलिटरी स्टेशनमध्ये ७०२ इंजिनियर प्लांट युनिटमध्ये कार्यरत होते. ते २३ मार्च रोजी सुट्टीसाठी गावी आले होते. गुरुवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रूपाली, मुलगा युवराज आणि मुलगी आराध्या असा परिवार आहे.
शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. सजवलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत पार्थिव ठेवून 'वीर जवान अमर रहे'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. स्मशानभूमीत लष्कर व पोलिसांकडून तीन फेऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मुलगा युवराज याने मुखाग्नी दिला.
या वेळी कुटुंबीयांचा आक्रोश हृदयद्रावक होता. अंत्यसंस्कारावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, महेश पाटील, सभापती नंदाताई यादव, प्रशांत कदम, लष्करी अधिकारी तसेच कराड तालुक्यातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.