
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांच्या कथिक व्हायरल व्हिडिओवरुन राजकीय वर्तूळात एकच खळबळ माजली आहे. या व्हिडिओवरुन विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी याप्रकरणावर मौन सोडलं आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली आहे. यानिमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले आहेत. तसंच आक्षेप घेतले आहेत. अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्यांच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असे दावे केले जात आहेत. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही हे मी स्पष्ट करतो."
तसंच, "या सर्व आरोपांची चौकशी करण्याची मागणी करत ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य व्हिडिओ क्लिप जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास त्याची सत्यता तपासावी आणि त्याचीही चौकशी करावी, अशी मागणी मी आपणास करतो", अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्र पाठवून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सोमवारी संध्याकाही एका मराठी वृत्तवाहिनीने किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवले होते. त्यात सोमय्या यांचे अश्लिल चाळे पाहायला मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रिक्रिया उमटू लागल्या आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील त्यांच्याकडे अशा अनेक क्लिप असल्याचा तसंच अनेक तक्रारी असल्याचा दावा केला आहे. आता बोललो तर महिलांची ओळख दाखवावी लागेल असं त्यांनी सांगितलं आहे.
तर दुसऱ्यांवर चिखल उडवणारे सोमय्या स्वत: चिखलात लोळतायेत. महिलांसोबत असे अश्लिल प्रकार करत असतील तर त्यांना दुसऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, असं म्हणत भाजपने किरीट सोमय्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे.