काँग्रेसने आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली. महाराष्ट्रातून पक्षाने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे. सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढणार आहेत.
काँग्रेसने आज चार नावांची घोषणा केली. राजस्थानातून सोनिया गांधी, हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनुसिंघवी, बिहारमधून अखिलेश प्रताप सिंह आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसने राज्यसभेचे तिकीट दिले आहे. हंडोरे यांना पक्षाने विधान परिषदेचंही तिकीट दिलं होतं. मात्र त्या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर आता पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. हंडोरे यांनी मुंबईतील चेंबूरमधून माजी आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये हंडोरे सामाजिक न्याय मंत्री होते.
रायबरेली कुणाकडे?
सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार असल्यामुळे त्या लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झालंय. त्यामुळे आता सोनिया यांच्या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून कोण लढणार याबाबत चर्चा आहे. प्रियंका गांधी-वडेरा रायबरेलीतून लोकसभेसाठी उभ्या राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.