नागपूरमध्ये साऊंड सिस्टिमवर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

नागपूर पोलीस आयुक्तालयाने आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेत शहरात ४ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ११:५९ वाजेपर्यंत उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा (साऊंड सिस्टिम) आणि लेझर बीम लाइट्सच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
नागपूरमध्ये साऊंड सिस्टिमवर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
नागपूरमध्ये साऊंड सिस्टिमवर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Published on

नागपूर : नागपूर पोलीस आयुक्तालयाने आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेत शहरात ४ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ११:५९ वाजेपर्यंत उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा (साऊंड सिस्टिम) आणि लेझर बीम लाइट्सच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत.

बंदीमागील कारणे

गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजुद्दीन बाबांची छब्बिसी, गणेशोत्सव (आगमन व विसर्जन मिरवणुका), धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमी/दसरा या सणांच्या मिरवणुकांमध्ये डिजे व साऊंड सिस्टीममुळे वाद आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे ही ध्वनिवर्धक यंत्रणा 'पर्यावरण संरक्षण कायदा १९८६' आणि 'ध्वनी प्रदूषण (नियंत्रण आणि नियमन) नियम २०००' मधील तरतुदींचे उल्लंघन करते. लेझर आणि बीम लाईट्समुळे नागरिकांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत होऊ शकते, आरोग्य धोक्यात येऊ शकते, तसेच वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघाताची भीती निर्माण होते ही बंदीमागील मुख्य कारणे आहेत.

‘या’ उपकरणांवर बंदी

डॉल्बी आणि प्लाझ्मा साऊंड सिस्टिम, प्रेशर म्युझिक सिस्टिम, मॉडिफाइड (बदल घडवून आणलेली) साऊंड सिस्टिम, बीम व लेझर लाइट सिस्टिम या उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने सर्व कार्यक्रम आयोजक, मंडळांचे पदाधिकारी, साऊंड सिस्टिम चालक-मालक आणि लेझर लाइट चालकांना या आदेशाचे कडक पालन करण्याचे आवाहन केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in