राज्यात खरीप हंगामातील एकूण ९५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

कापसाच्या ९९ टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. राज्यात सोयाबीन पिकानंतर कापूस पिकाचे क्षेत्र दुसऱ्या स्थानी आहे
राज्यात खरीप हंगामातील एकूण ९५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

राज्यात खरीप हंगामातील एकूण उपलब्ध क्षेत्रापैकी ९५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात खरीप हंगामातील पिकांखाली सरासरी १४३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १३६ लाख हेक्टरवरील म्हणजे सरासरीच्या ९५ टक्के क्षेत्रांवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, या खरीप हंगामातील खरिपातील मुख्य पीक म्हणून सोयाबीन पिकाची ओळख अधोरेखित झाली आहे. कारण सोयाबीनची ४७ लाख ४१ हजार हेक्टरवर (११४ टक्के) पेरणी पूर्ण करीत जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

कृषी विभागाच्या ३ ऑगस्टअखेरच्या अहवालात ही माहिती दिली आहे. सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र ४१.४३ लाख हेक्टर आहे. गतवर्षी ४३ लाख हेक्टर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी पूर्ण झाली होती. हा विक्रमही यंदा मोडीत निघून ४७.४१ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे भरीव उत्पादन अपेक्षित मानले जात आहे.

कापसाच्या ९९ टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. राज्यात सोयाबीन पिकानंतर कापूस पिकाचे क्षेत्र दुसऱ्या स्थानी आहे. ४१.७० लाख हेक्टरवर कापसाची पेरणी पूर्ण झाली आहे, तर सोयाबीन आणि कापूस पिकाखाली सुमारे ८९ लाख हेक्टरइतके सर्वाधिक क्षेत्र आहे.

दमदार पावसामुळे भात लावण्यांना चांगलाच वेग आलेला आहे. त्यामुळे ८२ टक्के म्हणजे सुमारे १२.५१ लाख हेक्टरवरील भात लावण्या पूर्ण झालेल्या असून, येत्या आठवड्यात हा आकडा आणखी वाढण्याचा अंदाज कृषी आयुक्तालयातून वर्तविण्यात आला. खरीप ज्वारी आणि बाजरीच्या पेरण्या तुलनेने कमी झालेल्या आहेत. तसेच, तूर आणि उडदाच्या पेरण्या तुलनेने चांगल्या असल्या, तरी मुगाच्या ६७ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्याचेही अहवालात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in