Ravikant Tupkar: सोयाबीन, कापूस आंदोलन पेटणार! रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून अटक

२८ नोव्हेंबरला मुंबईला धडक देऊन २९ नोव्हेंबर रोजी मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता.
Ravikant Tupkar: सोयाबीन, कापूस आंदोलन पेटणार! रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून अटक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना शनिवारी बुलढाणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चिखली रोडवरील राहत्या घरुन त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. रविकांत तुपकर यांना अटक केल्यानंतर आता सोयाबीन आणि कापूस आंदोनल अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २० नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात एल्गार महामोर्चा काढला होता. जिल्हाभरातून हजारो शेतकरी बुलढाण्यात धडकले होते. शेतकऱ्यांच्या मागण्याचा विचार झाला नाही. तर २८ नोव्हेंबरला मुंबईला धडक देऊन २९ नोव्हेंबर रोजी मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी नोटीस देखील बजावली होती. परंतु असा नोटीसींना आपण भीक घातल नाही, असं तुपकर यांनी म्हटलं होतं.

बुलढाणा पोलिसांनी शनिवारी सकाळी तुपकरांच्या अटकेची पूर्वतयारी केली. बुलढाणा शहर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त आधी निवासस्थानी तैनात केला. त्यानंतर दुपारच्या सुमारास तुपकर यांना ताब्यात घेण्यात आलं. बुलढाणा शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस तैनात करण्यात आला आहे. या घटनेकडे शेतकऱ्यांसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

रविकांत तुपकर यांना पोलिसांकडून अटक झाल्याचं कळताच त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापसाला हमी भाव मिळावा राज्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी एल्गार मोर्चा काढला होता. परंतु सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नाही. आज खोके सरकारनं पोलिसांच्या माध्यमातून तुपकरांना अटक केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि तुपकरांची सुटका सरकारने केली नाही. तर उद्यापासून आम्ही मंत्र्यांच्या गाड्या जाळू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथडे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे तुपकरांना अटक केल्याच्या निषेधार्थ चिखली तालुक्यातील जालना-खामगाव महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in