सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच; उलाढाल ठप्प, तुरीला मिळाला सरासरी ९ हजार ४०० रुपये क्विंटलचा भाव

आज ना उद्या सोयाबीन पिकाचे दर वाढतील, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची दिवसेंदिवस निराशा होत आहे.
सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच; उलाढाल ठप्प, तुरीला मिळाला सरासरी ९ हजार ४०० रुपये क्विंटलचा भाव

भास्कर जामकर/नांदेड

आज ना उद्या सोयाबीन पिकाचे दर वाढतील, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची दिवसेंदिवस निराशा होत आहे. नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये सध्या क्विंटलामागे अडिचशे रुपयांनी दरात घसरण झाली आहे. ४ हजार ३४५ रुपयांनी खरेदी होत आहे. मागील आठवड्यात ४ हजार ६०० रूपये इतका दर मिळत होता. तसेच तूरची आवक सुरू झाली असून, सरासरी ९ हजार ४०० रूपये क्विंटलला भाव मिळाला आहे. दरम्यान, पुढे सोयाबीनचे दर वाढतील याची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून नगदी पीक म्हणून सोयाबीन, कपाशी या पिकाकडे वळले आहेत. मागील खरिपामध्ये चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती, तर दोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती.

पावसाळ्यात कधी अतिवृष्टी, महापूर तर कधी १५ दिवस पावसाने उघडीप दिली. त्यामुळे त्याचा खरिपाच्या पिकावर आणि पिकाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. विशेष करून सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले. यातून काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या या पिकांच्या काढणीनंतर दरात घसरण झाल्याने शेतकरी कमालीचे अडचणीत आले आहेत. सुरवातीला पाच हजार ५०० रूपये सोयाबीनला क्विंटलाचा दर मिळाला होता. यात आणखी दर वाढतील, या आशेवर सोयाबीन घरात साठवून ठेवले होते. हंगाम संपत आला तरी, अद्याप सोयाबीनच्या दरात वाढ झाली नसून आहे ते दरही घसरत असल्याचे चित्र आहे. तर, कापसाला खासगीत सुरवातीला साडेसात हजार रूपये क्विंटलाचा दर मिळाला होता. आता सहा ते साडेसहा हजार रूपये क्विंटलला दर मिळत आहे. या दोन्ही पिकांची सारखीच स्थिती असून, दर घसरल्याने बाजारपेठेतील उलाढालाही ठप्प झाल्याचे चित्र आहे.

तुरीच्या रोज ३० ते ४० गोण्यांची आवक

मागील दोन ते तीन दिवसांपासून बाजारपेठेत तुरीची आवक सुरू झाली आहे. रोजी ३० ते ४० तुरीच्या गोण्या येत आहेत. बुधवारी तूरीला कमाल ९ हजार ६००, किमान ८ हजार ८६० तर सरासरी ९ हजार ४०० रूपये क्विंटलाचा दर मिळाला. तर, हळद कमाल १३ हजार ७००, किमान दहा हजार व सरासरी १२ हजार २०० रूपये क्विंटलाला दर मिळाला आहे. नवीन हळद पुढील आठ ते दहा दिवसात दाखल होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in