मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान ; मुख्यमंत्र्यांनी साधला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद

मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत
मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान ; मुख्यमंत्र्यांनी साधला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद
Published on

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, हिंसाचारात अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून, लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला, देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आश्वस्त केले आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ मणिपूर सरकारशी संपर्क केला आणि या विद्यार्थ्यांना तत्काळ, परिस्थिती पूर्वपदावर येईस्तोवर सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली. शिवाय या विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याची सुद्धा व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या वतीने तत्काळ केली जात आहे.

मणिपूरमध्ये अडकलेल्या तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शिंदेंची मणिपूर, आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मणिपूरमध्ये अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार असून, तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना मणिपूरहून आसाममध्ये आणण्यात येईल. मणिपूरहून आसामपर्यंत आणताना या विद्यार्थ्यांना विशेष सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

logo
marathi.freepressjournal.in