अटल सेतू : उद्यापासून मुंबई ते नवी मुंबई २० मिनिटांत; पण कार, टॅक्सी, बससाठी स्पीड लिमीट किती? दुचाकी, ऑटोरिक्षाला 'नो एंट्री'

उद्या, १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे अनावरण होणार. या पुलावरुन दुचाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टर ही वाहने हाकण्यावर बंदी.
अटल सेतू : उद्यापासून मुंबई ते नवी मुंबई  २० मिनिटांत; पण कार, टॅक्सी, बससाठी स्पीड लिमीट किती? दुचाकी, ऑटोरिक्षाला 'नो एंट्री'

मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक एमटीएचएल अर्थात शिवडी-न्हावा शेवा पुलावर वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा १०० किमी निश्चित करण्यात आली आहे. तसेच या पुलावरुन दुचाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टर ही वाहने हाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एमटीएचएल या पुलाला अटल सेतू, असे नाव देण्यात आले असून उद्या, १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे अनावरण करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी कार, टॅक्सी, हलकी मोटर वाहने, मिनीबस आणि दोन ॲक्सल बसेस यांसाठी कमाल वेग मर्यादा ताशी १०० किमी ठेवली आहे.

या पुलावरून मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार होणार आहे. एमटीएचएलवर कारसाठी ५०० ऐवजी २५० रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी परतीचा पास एकेरी टोलच्या दीडपट, दैनिक पास एकेरी टोलच्या अडीचपट आणि मासिक पास एकेरी टोलच्या ५० पट अशी सवलत देण्यात आली आहे. अटल सेतू उभारणीसाठी २१ हजार २०० कोटी रुपये इतका खर्च आला असून त्यापैकी १५ हजार १०० कोटी इतके कर्ज घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे १५ कि.मी. इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत होईल. परिणामी इंधनावरील खर्चात वाहनाकरिता किमान ५०० रुपये इतकी बचत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

सेतूविषयी थोडक्यात

मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग (एमटीएचएल) हा अति जलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना

५०० बोइंग विमाने व १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर.

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू एकूण २२ किमी लांबीचा असून त्यातील १६.५० किमी भाग समुद्रामध्ये तर उर्वरित ५.५० किमी भाग जमिनीवर.

भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील १२ व्या क्रमांकाचा सागरी सेतू. सागरी सेतूसाठी १८ हजार कोटींचा खर्च.

सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा.

मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाले.

महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला

logo
marathi.freepressjournal.in