गणरायाचं मनमोहक रूप सजतंय..!!

अखेरच्या रंगकाम आणि रेखणीच्या कामांना वेग, खऱ्या वस्त्र आणि काठा पदराच्या वस्त्रांना गणेशभक्तांकडून सर्वाधिक मागणी
गणरायाचं मनमोहक रूप सजतंय..!!

''रत्नखचित फरा तुजगौरीकुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरेजडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया! या गणरायाच्या आरतीतीतल शब्द पुन्हा प्रत्येकाच्या ओठी येऊ लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी घरांघरात, सार्वजनिक मंडळात लगबग सुरु झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला बहुतांश मूर्तिकारांकडून गणरायाच्या अखेरच्या रंगकाम आणि रेखणीच्या कामांना वेग आला आहे. भक्तांचे मुख्य आकर्षण असणाऱ्या डोळ्यांच्या अदाकारीसाठी रेखणीच्या कालाकारांकडून विशेष कष्ट घेत गणरायाचे रूप सजवले जात आहे.

३१ ऑगस्टपासून देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. सार्वजनिक मंडळांकडून देखावे उभारण्यासाठी ८ ते १० दिवस आधीच गणरायाला थाटामाटात नेले जाते. तर बहुतांश घरगुती गणपती उत्सवाच्या आदल्या दिवशी प्रतिष्ठापनेसाठी नेले जातात. बाप्पाला आकर्षक रोषणाईत उत्तम देखाव्यात पाहण्याचा सर्वांना मानस असतो. परंतु त्याआधी आपल्या लाडक्या गणरायाला मनमोहक असे रूप आणि वस्त्रे परिधान करावे अशी मागणी भक्तांकडून मूर्तिकारांकडे केली जाते. अशातच मागील काही वर्षांपासून गणरायाला आकर्षक फेटा आणि धोतर परिधान करून सजविण्याचा ट्रेंड सुरू आहे. फेटा घालण्याची प्रथा जुनीच असली तरी, यंदा विविध रंगी फेटा घालण्याची मागणी वाढली असल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे. फेट्यात आकर्षक दिसणाऱ्या गणरायाच्या साजिऱ्या मूर्ती भाविकांना भावत आहेत. थोडं मागे गेलो तर ३-४ वर्षांपूर्वी वेलवेट धोतर आणि कापडी शेला असणाऱ्या मूर्तींना मागणी होती. मात्र अलीकडे खऱ्या वस्त्र आणि काठा पदराच्या वस्त्रांना गणेशभक्तांकडून सर्वाधिक मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर मूर्तिकार गणरायावर अखेरचा हात फिरवत असताना वस्त्र कलाकार गणरायाच्या अंगावरील वस्त्रे, शेले, फेटा याच्या आकर्षक सजावटीत व्यग्र आहेत. गणेशभक्तांकडून यंदा आकर्षक रंगसंगतीच्या, विविध प्रकारच्या फेट्यांची मागणी करण्यात येत आहे. यानुसार यंदा ठिकठिकाणी पितांबर आणि फेट्यात खुलून दिसणाऱ्या गणरायाच्या मूर्ती पाहायला मिळत आहेत.

भक्तांच्या मागणीनुसार आलेल्या मूर्ती सर्वाधिक

गणेशोत्सवासाठी कुटुंबे, मंडळे महिनाभर आधी गणपती बुकिंगसाठी मूर्तिशाळा गाठतात. त्याठिकाणी आपल्याला हव्या असलेल्या गणरायाला उत्सवावेळी वाजतगाजत घरी आणतात. परंतु सध्याच्या डिजिटल युगात गणरायची रूपे, रंगसंगती, पेहराव, त्यांची सजावट यामध्ये मोठा बदल झाला आहे. भक्तांकडून विविध प्रसिद्ध गणरायाच्या रुपांसारख्या अथवा तशाच दिसणाऱ्या मुर्त्यांची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे भक्तांच्या मागणीप्रमाणे मूर्ती आणणे, त्यांना योग्य जागेवर ठेवणे, कारखान्यातील सर्व रंग, शेला किनार, हिरे-मोती-खडे, कापडी धोतर, पापण्या अशा प्रकारचे सामान बाजारातून आणणे हे मूर्तिकारांसाठी सध्या कौशल्याचे झाले आहे. सद्यस्थितीत गणेशभक्तांच्या पसंतीस उतरण्यासाठी मूर्तींवर कलाकुसर केली जात असून भक्तांच्या मागणीनुसार आलेल्या मूर्ती मूर्तिशाळांमध्ये सर्वाधिक दिसत आहेत.

बहुतांश भक्तांचा कल इको फ्रेंडली गणरायांकडे

पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने विटंबना होत असल्याचे प्रतिवर्षी कानी ऐकू येते. मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करून आपण घरच्या घरी बाप्पांचे विसर्जन करू शकतो. तलाव आणि विहिरींमधील वाढलेले प्रदूषण पाहता गेल्या दोन-चार वर्षांपासून गणेशमूर्तीचे घरी विसर्जन करण्याची प्रथा रूढ होत आहे. यासाठी शासनाकडून आवाहन करण्यात येत असून अनेक सामाजिक संस्थानी देखील पुढाकार घेतला आहे. यामुळे बहुतांश गणेशभक्त यंदा जनजागृती म्हणून आणि पर्यावरणाला हातभार म्हणून पीओपीच्या गणेशमूर्ती टाळून शाडूच्या, कागदाच्या मूर्तींची मागणी करत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in