
भास्कर जामकर/नांदेड : भोकर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर झाली असून मतदारांनी अखेर चव्हाण कुटुंबीयांवर असलेल्या अपार प्रेमाची साक्ष देत भाजप महायुतीच्या उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण (१,३३१८७) मते मिळाली असुन त्याना विजयी घोषित केले आहे. त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तिरुपती बाबुराव कोंढेकराना (८२,६३६.) मतावर समाधान मानावे लागले असून मतदारांनी नाकारल्याने त्याचा दारूण पराभव झाला आहे. अपक्षासह इतर पक्षांच्या उमेदवारांचे अनामत जप्त झाले आहे. भाजपला प्रामुख्याने लाडकी बहीण योजनेने तारल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघ हा प्रारंभीपासून कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी राजकीय भूकंप घडवून काँग्रेसचा हात सोडून भाजपशी घरोबा केल्याने राजकीय समीकरण बदलले आहे. काँग्रेसचा गड असेलल्या मतदार संघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तेलंगणाचे मूख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जाहीर सभा घेतली त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. पहिल्यांदाच मतदारांनी भाजपास संधी दिल्याने अशोक चव्हाणांचे राजकीय वजन असल्याचे सिद्ध झाले आहे. येथील जनतेची चव्हाण कुटुंबियांशी असलेले जिव्हाळ्याचे अतूट नाते मतदानाद्वारे दाखवून दिले आहे. भाजप महायुतीच्या विजयी उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण (१,३३१८७), प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार तिरुपती बालाजी कोढेकर (८२,६३६), वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार सुरेश राठोड (८,८७२), जनहित लोकशाही आघाडीचे नागनाथ घिसेवाड (१,२७२) मते मिळाली.
काँग्रेसला चिंतन करण्याची गरज
नांदेड जिल्ह्यातील ९ पैकी ९ जागांवर महायुतीचे उमेदवार निर्विवादपणे विजयी झाले. यात पाच विद्यमान आमदारांसह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या विजयी झाल्या आहेत. भाजपचे भीमराव केराम (किनवट), राजेश पवार (नायगाव) आणि डॉ. तुषार राठोड (मुखेड) व जीतेश अंतापूर (देगलूर) तर, शिवसेनेचे बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर) हे पाच विद्यमान आमदार पुन्हा विजयी झाले, तर महायुतीचे उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर (लोहा) आणि शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीक (हदगाव), आनंदराव तिडके बोंढारकर (नांदेड दक्षिण), भाजपच्या श्रीजया अशोक चव्हाण (भोकर) या नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे, तर लोहा मतदारसंघात चिखलीकरांच्या भगिनी आशा शिंदे (शेकाप), काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव जवळगावकर (हदगाव), काँग्रेसने माजी महापौर अब्दुल सत्तार (नांदेड उत्तर), मुखेडमध्ये काँग्रेसचे माजी आमदार हनमंतराव पाटील-बेटमोगरेकर, किनवटमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक पराभूत झाले, तर देगलूरमध्ये सुभाष साबणे यांचाही आणखी एक पराभव झाला. तसेच माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील (काँग्रेस) यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे.
लेक झाली लाडकी
भाजप महायुतीच्या उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण यांनी प्रचारादरम्यान मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला आहे. जाहीर सभा बैठकातून थेट जनतेशी संवाद साधला त्यावेळी मी तुमची नात, भाची, लेक समजून मतदानातून आशीर्वाद द्यावा, अशी भावनिक साद घातली होती.त्यामुळे मतदाराची "लेक झाली लाडकी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
विकासाला पसंती
मतदारसंघात पहिल्यांदा गृहमंत्री (कै.) शंकरराव चव्हाण यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण झाले त्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, माजी आमदार अमिता अशोक चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केले.
मतदारांचा विजय, भोकर विधानसभा मतदारसंघातील सुजाण मतदारांनी राजहंसाची भूमिका घेतली असून माझ्या विजयासाठी अथक परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचा विजय आहे.
- आमदार श्रीजया चव्हाण