'हे' तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसते का ? श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

दीड वर्षाच्या निरागस, चिमुकल्याच्या ‘बापा’चं. माझं हे पत्र तुम्ही नीट, सहृदयतेनं पूर्णपणे वाचावं, अशी तुम्हाला सुरुवातीलाच हात जोडून विनंती
'हे' तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसते का ? श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

सभेत हिंदुत्वाचे काय विचार ऐकवलेत हे तुमचे तुम्हाला ठाऊक; मात्र तुम्हाला इतकेच विचारायचे आहे, की एका दीड वर्षाच्या बाळाला आपल्या भाषणात खेचणे हे तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसते का, असा सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी एका पत्राद्वारे हा प्रश्न केला आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासदार मुलाचे नाही तर हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षाच्या निरागस, चिमुकल्याच्या ‘बापा’चं. माझं हे पत्र तुम्ही नीट, सहृदयतेनं पूर्णपणे वाचावं, अशी तुम्हाला सुरुवातीलाच हात जोडून विनंती, असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मुलगा खासदार, नातवाचाही नगरसेवकपदावर डोळा, अशी टीका केली होती. त्याला आता श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांना उद्देशून पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. उद्धवजी, तुम्हाला आठवतंय का तुम्ही काल काय बोललात ते? उद्धवजी तुम्हाला आठवतंय का माझ्या मुलाचा-रुद्रांशचा उल्लेख तुम्ही कसा केलात ते? माझा उल्लेख तुम्ही ‘कार्टं’ असा केलात. चला, ठीक आहे, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही बोललात म्हणून सोडून दिलं आम्ही. पण, तुम्ही हद्दच केलीच. माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून, ‘त्याचा नगरसेवकपदावर डोळा आहे’ असं वक्तव्य केलंत तुम्ही. उद्धवजी, ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? मुख्यमंत्री असताना स्वतःला ‘कुटुंबप्रमुख’ म्हणवत होतात ना? मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो?

उद्धवजी, कुठे आदरणीय, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे तुम्ही. आदरणीय बाळासाहेबही विरोधकांवर जळजळीत टीका करायचे; पण त्यांनी असली हीन व गलिच्छ टिप्पणी कधीही केली नाही. तुम्हाला कल्पना आहे का, कालच्या तुमच्या वक्तव्यानं आमच्या कुटुंबातील लोकांना किती धक्का बसला आहे तो? तुम्ही काल जे बोललात, ते ऐकून बाळाची आई व आजी दोघी कमालीच्या दुखावल्या. धास्तावल्यात. डोळ्यांत अश्रू दाटून आले त्यांच्या, असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. पत्राच्या शेवटी एका बापाची हात जोडून, डोळ्यांत पाणी आणून विनंती. राजकारण होतच राहील हो. टीका टिप्पणी होतच राहील; पण त्यात निरागसतेला ओढू नका हो. पाप आहे हे. आणि तेही कुठेही फेडता येणार नाही असं. त्या पापाचे धनी होऊ नका. कृपा करा, अशी विनंतीही श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in