दहावीचा निकालात कोकण मंडळाची बाजी; मुलींचे वर्चस्व कायम, राज्याची टक्केवारी घसरली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.
दहावीचा निकालात कोकण मंडळाची बाजी; मुलींचे वर्चस्व कायम, राज्याची टक्केवारी घसरली
दहावीचा निकालात कोकण मंडळाची बाजी; मुलींचे वर्चस्व कायम, राज्याची टक्केवारी घसरली
Published on

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल  शुक्रवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही गतवर्षीच्या तुलनेत यंदा २.०१ टक्क्यांची घसरण झाली आहे. कोकण विभागाने निकालात आपले अव्वल स्थान कायम राखले असून छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

यंदाच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून एकूण १५,५५,०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले आणि १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी विभागनिहाय खालीलप्रमाणे आहे:

यंदाच्या निकालात कोकण विभागाने ९७.६२ टक्के निकालासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१ टक्के) लागला आहे.  परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५५ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले होते आणि १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्तेचा विचार करता, ४,२२,८९१ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे, तर ४,८२,२६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३,८०,४३७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली असून १,३४,९३४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील एकूण ६,६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आता एकाच कागदावर

मंडळाने यंदापासून एक मोठा बदल केला असून, आतापर्यंत स्वतंत्र मिळणारी गुणपत्रिका  आणि प्रमाणपत्र आता एकाच कागदावर एकत्रित स्वरूपात दिले जाणार आहे. हा निकाल आज दुपारी १ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत सात वेबसाईटसह डिजीलॉकरवर उपलब्ध झाला आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य स्तरावर १० समुपदेशक आणि एससीईआरटी मार्फत ३१५ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 'टेलीमानस' (१४४१६) आणि 'मनोदर्शन' (८४४८४४०६३२) या हेल्पलाईनद्वारे मानसिक आधार देण्याचे काम करण्यात आले.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी

जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांनी खचून न जाता पुरवणी परीक्षेसाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एटीकेटी (ATKT) सुविधेसाठी ४१,८६५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तसेच, जे विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ इच्छितात, त्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत पुढील तीन संधी उपलब्ध करून दिल्या जातील. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआय (ITI) मधील काही कोर्सेस निवडून कौशल्य विकासासोबत दहावीचे प्रमाणपत्र मिळवावे, असा महत्त्वपूर्ण सल्लाही शिक्षण विभागाने दिला आहे.

गुण पडताळणीसाठी विद्यार्थी ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठीची प्रक्रियाही बोर्डाच्या वेबसाईटवर सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लातूरची टक्केवारी घसरली, पण १०४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

दहावी परीक्षेचा निकालात लातूर विभागाची कामगिरी इतरांच्या तुलनेत फार समाधानकारक नाही. पण लातूर मंडळातील १०४ विद्यार्थांनी १०० टक्के गुण मिळवत मंडळाचा दबदबा कायम राखला आहे. राज्यातील एकूण १७९ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. पुणे मंडळातील १२, नागपूर मंडळातील ३, छत्रपती संभाजी नगर मंडळ २४, मुंबई ५, कोल्हापूर १५, अमरावती ३, नाशिक ६ आणि कोकण मंडळातील ७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. बारावीच्या परिक्षेतही लातूरची कामगिरी फारशी चांगली नव्हती. लातूर पॅटर्नचा दबदबा कमी झाला असला तरी पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्यांमध्ये त्यांनी अव्वल क्रमांक राखला आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

  • राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख २२ हजार ८५१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ४ लाख ८२ हजार २६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ लाख ८० हजार ४३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर १ लाख ३४ हजार ९३४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

  • राज्यातील २३ हजार ६९८ माध्यमिक शाळांतून १५ लाख ५५ हजार २६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार ६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

  • दहावी परीक्षा मार्च २०२३ चा निकाल ९३.८३ टक्के लागला होता. मार्च २०२४ चा निकाल ९५.८१ टक्के, तर फेब्रु.-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल ९४.१० टक्के आणि फेब्रु.-मार्च २०२६ च्या नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे.

  • गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २.०१ टक्के ने कमी लागला आहे.

विभागीय मंडळनिहाय निकालाची टक्केवारी

  • कोकण - ९७.६२

  • मुंबई - ९४.९७ टक्के

  • पुणे - ९४.२४ टक्के

  • नागपूर - ८९.०७ टक्के

  • छत्रपती संभाजीनगर - ८८.४१ टक्के

  • कोल्हापूर - ९५.४७ टक्के

  • अमरावती - ९०.५० टक्के

  • नाशिक - ९०.५३ टक्के

  • लातूर - ८८.४२ टक्के

logo
marathi.freepressjournal.in