एसटी प्रवाशांचे होणार विमानासारखे स्वागत; घटती प्रवासी संख्या रोखण्यासाठी परिवहन महामंडळाची राज्यव्यापी मोहीम

ताफ्यात वाढ करूनही प्रवाशांची संख्या घटत असल्याने राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी सध्या चिंतेत आहे. त्यावर उपाय म्हणून येत्या एक मेपासून "आपली बस, आपली सेवा" ही राज्यव्यापी मोहीम राबवली जाणार आहे.
एसटी प्रवाशांचे होणार विमानासारखे स्वागत; घटती प्रवासी संख्या रोखण्यासाठी परिवहन महामंडळाची राज्यव्यापी मोहीम
एसटी प्रवाशांचे होणार विमानासारखे स्वागत; घटती प्रवासी संख्या रोखण्यासाठी परिवहन महामंडळाची राज्यव्यापी मोहीम'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : 'नमस्कार, माझे नाव विजय पाटील, मी मुंबई ते सांगली या आजच्या बस सेवेचा वाहक आहे' अशा नम्र शब्दांत यापुढे कोणत्याही एसटीच्या प्रवासात आपले स्वागत होऊ लागले तर आश्चर्य वाटू देऊ नका. प्रवासी वाढवण्याच्या व सेवा सुधारण्याच्या एसटी महामंडळाच्या व्यापक मोहिमेचा एक भाग म्हणून असा सुखद बदल होणार आहे.

ताफ्यात वाढ करूनही प्रवाशांची संख्या घटत असल्याने राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी सध्या चिंतेत आहे. त्यावर उपाय म्हणून येत्या एक मेपासून "आपली बस, आपली सेवा" ही राज्यव्यापी मोहीम राबवली जाणार आहे.

कायमस्वरूपी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात स्वच्छता, वक्तशीरपणा आणि प्रवाशांशी संवाद सुधारण्याची थेट जबाबदारी चालक आणि वाहकांवर सोपवण्यात आली आहे.

या उपक्रमात एनसीएमसी कार्ड, अॅप आणि वेबसाइटद्वारे ऑनलाइन बुकिंगला प्रोत्साहन देऊन डिजिटल वापराला चालना देणार आहे. तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी आगार, विभाग आणि प्रादेशिक स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. फेरी रद्द झाल्यास तात्काळ परतावा आणि बस नादुरुस्त झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासनही या योजनेत देण्यात आले आहे.

'आपली बस' मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये

वक्तशीरपणा : बस सुटण्याच्या किमान १५ मिनिटे आधी प्लॅटफॉर्मवर लावणे बंधनकारक असेल.

शिस्त : कर्मचारी गणवेश, बॅज आणि नेमप्लेटसह कर्तव्यावर हजर असणे आवश्यक आहे.

प्रवासी संवाद : प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी वाहक स्वतःची आणि चालकाची ओळख करून देतील. तसेच मार्ग, थांबे आणि उपलब्ध जागांची माहिती प्रवाशांना देतील.

प्रवासी सहाय्य : आरक्षित प्रवासी गैरहजर असल्यास वाहक त्यांच्याशी संपर्क साधतील. तसेच प्रवाशांना सामानाची सुरक्षा आणि शिस्तीबाबत मार्गदर्शन करतील.

logo
marathi.freepressjournal.in