एसटी महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर, या महिन्यात महामंडळाला अवघा २२ कोटी तोटा

गेली पाच ते सहा वर्षे अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाची अखेर आर्थिक आघाडीवर नफ्याच्या दिशेने घोडदौड सुरू झाली आहे.
एसटी महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर, या महिन्यात महामंडळाला अवघा २२ कोटी तोटा
Published on

गेली पाच ते सहा वर्षे अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाची अखेर आर्थिक आघाडीवर नफ्याच्या दिशेने घोडदौड सुरू झाली आहे. जुलै महिन्यात ३१ विभागांपैकी १८ विभागांनी नफा कमावला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाला अवघा २२ कोटी इतका नाममात्र तोटा झाला आहे. यंदा एप्रिल ते जुलै २०२४ मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३१ कोटी रुपयांनी तोटा कमी झाला आहे.

जुलै महिन्यात नफा कमावणाऱ्या विभागांचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अभिनंदन केले आहे. उर्वरित विभागांनीदेखील प्रयत्नांची पराकाष्ठा करून ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महामंडळ फायद्यात येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. दोन वर्षे कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय ? अशी अवस्था निर्माण झाली होती. मे २०२२ पासून एसटीची वाहतूक सेवा सुरळीत सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनःश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या. ज्यामुळे एसटीच्या प्रवासीसंख्येत भरघोस वाढ झाली. सध्या ५३ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत. याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात " हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान", विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्षे तोट्यामध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बसफेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या. या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून जुलै महिन्यामध्ये ३१ विभागांपैकी १८ विभाग नफ्यामध्ये आले आहेत.

"ऑगस्ट महिन्यात उर्वरित येतील व पर्यायाने महामंडळ नफ्यात येईल, जेणेकरुन एसटीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल. "

- डॉ. माधव कुसेकर - एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

या विभागांनी कमावला नफा

जालना (३.३४ कोटी), अकोला (३.१४ कोटी), धुळे (३.७ कोटी), परभणी (२.९८ कोटी), जळगाव (२.४० कोटी), बुलढाणा (२.३३ कोटी) या विभागांनी २ कोटीपेक्षा जास्त नफा कमावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in