
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी मान्यताप्राप्त संघटनांनी २९ ऑगस्टला लाक्षणिक उपोषणाचे आयोजन केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास १९ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. राज्य कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला आहे.नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२२पासून महागाई भत्ता ३४ टक्के करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऑगस्ट २०२२च्या वेतनासोबत थकबाकी मिळणार आहे; मात्र एसटी कामगारांना सध्या २८ टक्केच महागाई भत्ता मिळत आहे. शासनाच्या निर्णयानुसार एसटी कामगारांनाही जानेवारी २०२२पासून ३४ टक्के महागाई भत्ता द्यावा, तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या वेतनासोबत थकबाकी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
बेमुदत उपोषणगणपतीपूर्वी मागण्यांची दखल न घेतल्यास संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.