आता ST कर्मचाऱ्यांनाही ५८ टक्के महागाई भत्ता; घरभाडे भत्ताही वाढविण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
आता ST कर्मचाऱ्यांनाही ५८ टक्के महागाई भत्ता; घरभाडे भत्ताही वाढविण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा
आता ST कर्मचाऱ्यांनाही ५८ टक्के महागाई भत्ता; घरभाडे भत्ताही वाढविण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा(Photo-X/@PratapSarnaik)
Published on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तत्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश यावेळी प्रशासनाला देण्यात आले. तसेच वेतनवाढीची थकबाकीही आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

मुंबई सेंट्रल येथील वाहतूक भवन या महामंडळाच्या मुख्यालयात गुरुवारी राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक व प्रशासकीय मागण्यांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली.

बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे सर्व कर्मचारी संघटनांना शुभेच्छा देताना, "सामंजस्याची भूमिका घेऊन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे," असे आवाहन केले.

कामगार संघटनांशी सातत्याने संवाद साधून प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल, असे सांगताना मंत्री सरनाईक म्हणाले, "महामंडळाच्या सर्व संघटनांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेली समिती तातडीने स्थापन करण्यात यावी. उत्पन्नवाढीसाठी समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचनाही करण्यात आली.

बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईसाठी एसटीच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरुद्ध धडक मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम एसटीच्या उत्पन्नावाढीवर झाला असून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल असे सरनाईक यांनी यावेळी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in