
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दिवाळी भेट रक्कम मिळणार आहे. मात्र, ही रक्कम देण्यास सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ दिवाळी भेट रक्कम स्वतःच्या उत्पन्नातून देणार आहे. निधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने पुन्हा एकदा पलटी मारली असून सरकारचा नन्नाचा पाढा सुरूच आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारी या वर्षाची दिवाळी भेट रक्कम आचारसंहितेचा अडथळा आल्याने रखडली होती. सर्व कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट ६,००० रुपये दिवाळी भेट मिळणार
इतकी रक्कम दिवाळी भेट देण्यासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी एसटी प्रशासनाने ५२ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.
या प्रस्तावासंदर्भात महामंडळाने सरकारकडे वारंवार विचारणा केली. मात्र, सरकारने हा निधी उपलब्ध करून दिला नाही. सरकारी अधिकाऱ्यांकडून याबाबत आचारसंहितेचे कारण देण्यात येत होते. आता आचारसंहिता संपल्यानंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांना तातडीने वाटप करण्यात यावी, असे सरकारकडून एसटी प्रशासनाला कळविण्यात आले आहे. तसेच सरकार ही रक्कम एसटीला देणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.
यामुळे सरकारने निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात पुन्हा एकदा पलटी मारली असून सरकारचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. सध्या एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असून कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नाही. पीएफ, ग्रॅच्युईटीच्या रकमा वेतनातून कपात केल्या असे दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र या रकमा ट्रस्टकडे भरल्या जात नाहीत, असा आरोपही बरगे यांनी केला.
एसटीची २,९०० कोटींची देणी देय
विविध प्रकारची एकूण २,९०० कोटी रुपयांची देणी एसटीकडून पुरवठादार व इतरांना देय आहेत. आता आचारसंहिता संपल्यावरसुद्धा सरकार दिवाळी भेट रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार नसेल तर हे दुर्दैवी आहे. निवडणुकीत एवढे यश मिळाले असताना सरकार अजूनही एसटीला मदत करीत नाही आणि एसटी सक्षम करण्याच्या फक्त गप्पा मारल्या जात आहेत, असेही बरगे यांनी सांगितले.