File Photo
File PhotoANI

चालक-वाहकांसाठी चांगली बातमी! प्रोत्साहन भत्ता देण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय, एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम

प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक-वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना समप्रमाणात वाटण्यात येणार
Published on

मुंबई : प्रवासी वाहतूक करीत असताना एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहक यांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

यासाठी प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक-वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना समप्रमाणात वाटण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी सुरू केला आहे. 

एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी विविध उपयोजना व अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. ‘प्रवासी राजा दिन’, ‘कामगार पालक दिन’ यांसारखे उपक्रम राबवून प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्यक्ष प्रवासात प्रवाशांना अडचण आल्यास आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रत्येक बसमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. याबरोबरच तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त केले आहेत. इंधन बचतीसाठी चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे एसटी महामंडळाने ऑगस्ट २०२४ या महिन्यात १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये नफा मिळवला आहे. उत्पन्नवाढीत सातत्य राहण्यासाठी चालक-वाहक महत्त्वाचे असून त्यांची कामगिरी चांगली व्हावी, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

...तर भत्ता मिळणार नाही

प्रवासी तक्रार, प्रवाशांबरोबरची गैरवर्तणूक अथवा उत्पन्नवाढीसाठी अवैध मार्गाचा वापर केल्यास चालक-वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. योग्य कामगिरी करणाऱ्या चालक-वाहकांना प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in