एसटी महामंडळाला सदिच्छा दूताची गरज काय? दूत नेमण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची एसटी संघटनांची मागणी

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली
File Photo
File PhotoANI

प्रवाशांसाठी मोफत प्रवास, सवलतीच्या दरात प्रवास, हात दाखवा गाडी थांबवा यासह अनेक योजनांचा प्रसार-प्रचारासाठी प्रवासी राजदूत नेमण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने घेतला. त्यानुसार २००३ मध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी एसटी प्रवासी राजदूताची जबाबदारी स्वीकारली; मात्र एसटीच्या नियोजनशून्य कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांनी वर्षभरातच राजीनामा दिला. त्यानंतर नुकतेच महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित इलेक्ट्रिक एसटी बसेसच्या लोकार्पणप्रसंगी मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली; मात्र या नेमणुकीनंतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून प्रत्येक महिन्याला वेतनाचा प्रश्न डोके वर काढत असताना आमचे विविध प्रश्न आजही प्रलंबित असताना खेड्यपाड्यापासून शहरापर्यंत सर्वांसाठी प्रिय असणाऱ्या एसटी बसला दूताची आवश्यकता काय? त्यासाठी महामंडळ वायफळ खर्च का करत आहे? असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काही महिन्यांपूर्वी एसटीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये एसटीच्या सर्व योजना आणि एसटीची प्रतिमा उजळवण्यासाठी प्रवासी राजदूत नेमण्यात यावा अशी सूचना शिंदे यांनी केली. या निर्णयाबाबत एसटी प्रवासी संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला. हा विरोध आजही कायम असतानाच १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र दिवसरात्र काम करणाऱ्या एसटीचे चालक-वाहक याना प्रोत्सहन देत एसटीच्या प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी शासनाने प्रयत्न करण्याऐवजी दूत नेमत वायफळ खर्च महामंडळ करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

खेड्यापासून शहरापर्यंत प्रवासी जोडण्याचे काम एसटी महामंडळाकडून मागील कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. कोरोना काळ असू दे अथवा कोणतीही आपत्ती एसटी कर्मचारी कायम सेवेत कार्यरत राहिले आहे; मात्र असे असताना कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. दूत नेमण्याऐवजी कर्मचाऱ्यांना प्रोत्सहान भत्ता देत प्रवासी आणि उत्पन्न वाढवण्याकडे महामंडळाने सकारात्मकरित्या पाहणे आवश्यक असल्याचे मत एसटी संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in