
मुंबई : शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरीत करण्यास १६ जूनपासून सुरुवात झाली. केवळ १५ दिवसांत म्हणजे, १६ जून ते ३० जूनपर्यंत तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थी- विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६% इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. या अंतर्गत १ लाख ६१ हजार २०४ विद्यार्थ्यांना त्यांच्या, त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी पास वितरित केले. त्याचप्रमाणे शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना 'मोफत' एसटी पासचे वितरण केले जातात. या अंतर्गत ३ लाख ६० हजार १५० विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरीत करण्यात आले.
शालेय बस फेऱ्या रद्द करू नयेत !
आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना एकच बस फेरी उपलब्ध असल्याने ती रद्द झाल्यास त्यांची प्रचंड गैरसोय होते. यापुढे प्रत्येक आगार प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.