एसटीच्या सेवेत नवीन लालपरींचा ताफा, प्रवासी वाहतूक सेवेचा दर्जा सुधारणार

राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत लवकरच २,५०० नवीन बसचा ताफा दाखल होणार असून पहिल्या टप्यात ५० ते १०० नवीन डिझेल बस सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत महामंडळाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
एसटीच्या सेवेत नवीन लालपरींचा ताफा, प्रवासी वाहतूक सेवेचा दर्जा सुधारणार
Published on

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत लवकरच २,५०० नवीन बसचा ताफा दाखल होणार असून पहिल्या टप्यात ५० ते १०० नवीन डिझेल बस सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत महामंडळाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. एसटीच्या सेवेत या नवीन लालपरींचा समावेश झाल्यानंतर एसटीच्या प्रवासी वाहतूक सेवेचा दर्जा सुधारण्यास आणखी मदत होणार आहे.

वाहननिर्मिती क्षेत्रातील अशोक लेलँड या आघाडीच्या कंपनीला या बसेस पुरविण्यास सांगण्यात आलेले आहे़ एसटीच्या आवश्यकतेनुसार मॉडेल बनवून तयार झाले असून त्याची विविध स्तरांवर चाचण्या घेण्याचे काम सुरू होते़ १० सप्टेंबर रोजी कंपनीच्या तामिळनातील तिरुचिरापल्ली येथील कारखान्यात या मॉडेलचे अंतिम सर्वेक्षण करण्यात आले़ सप्टेंबर महिन्यापासून या लालपरी बसेसची पहिली खेप ५० ते १०० बस महामंडळाला पुरविण्यात येतील़

पहिल्या १०० बसचा ताफा मंडळाकडे दिल्यानंतर पुढील टप्प्यात १५० ते ३०० बसेस नाेव्हेंबर महिन्यात मंडळाला देण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे़ परिवहन महामंडळाने दिलेली २,५०० बसेसची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पुढील ८ ते ९ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता कंपनीने वर्तविली आहे.

तामिळनाडूत बसनिर्मिती

प्रोटोटाइपची अंतिम तपासणी १० सप्टेंबर रोजी अशोक लेलँडच्या तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथील कारखान्यात करण्यात आली. कंपनी पुढील महिन्यात वितरण सुरू करण्याच्या तयारीत आहे. ५० ते १०० बस ताफ्यात सामील होणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत अतिरिक्त १५० ते ३०० बस वितरीत केल्या जातील.

logo
marathi.freepressjournal.in