ST कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाइल अर्थ मंत्रालयात धूळ खात; राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार, एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम

एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता मिळाला नाही. यासाठी एसटी महामंडळाने निधी मागणीसाठी राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार केला आहे.
ST कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाइल अर्थ मंत्रालयात धूळ खात; राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार, एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम
Published on

मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता मिळाला नाही. यासाठी एसटी महामंडळाने निधी मागणीसाठी राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार केला आहे. यानंतरही निधीच्या मागणीची फाइल राज्य सरकारच्या अर्थ खात्यात निर्णयाविना पडून आहे. येत्या सोमवार पर्यंत ही रक्कम न मिळाल्यास मंगळवारपासून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने दिला आहे.

संघटनेने आंदोलनाची नोटीस परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या मार्फत राज्य सरकारला दिली आहे. त्यानुसार २४ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने निधी मागणीसाठी राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार केला आहे. याशिवाय राज्य सरकारच्या परिवहन विभागाने अनेकवेळा पत्रव्यवहार करून सुद्धा अर्थ खात्यातील अधिकारी या फाइलकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करावी, अन्यथा कर्मचाऱ्यांना बोंब मारो आंदोलन करून कानउघाडणी करावी लागेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

७२५.४६ ऐवजी केवळ ४०० कोटी मिळाले

एसटी महामंडळातील ८६००० कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेतनवाढ फरक रक्कम हप्ता मिळाला नसल्याने त्यासाठी एसटीने राज्य सरकारकडे १९२. ४६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. दर महिन्याला सरकारकडून येणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती रकमेसह एकूण ७२५.४६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असताना फक्त ४०० कोटी रुपये इतकी रक्कम राज्य सरकार कडून देण्यात आल्याने एसटीचे आर्थिक गणित बिघडले असून या महिन्यात वेतनवाढ फरकाची वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही. येत्या सोमवारपर्यंत ही रक्कम न मिळाल्यास मंगळवारपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचेही बरगे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in