
सुजीत ताजणे
आपल्या अद्भूत बुद्धीमत्तेने देशाला राज्यघटना बहाल करून अमरत्व मिळवलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आता ताऱ्याच्या रुपातही अमर होणार आहे. बाबासाहेबांच्या एका अनुयायाने ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा’ ही घोषणा सत्यात उतरवली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील आंबेडकरवादी कार्यकर्ते राजू शिंदे यांनी डॉ. आंबेडकरांच्या नावाने ताऱ्याची नोंद केली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अनंत काळापर्यंत घेतले जाणार आहे.
अवकाशातील ताऱ्यांची नोंद करणारी ‘इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री’ नावाची एक संस्था अमेरिकेत आहे. या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावे दिली जातात. फ्रान्समध्येही अशीच एक संस्था आहे. शंभर डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे नऊ हजार रुपये शुल्क भरून एका महासमितीमार्फत ताऱ्याची नोंद केली जाते. राजू शिंदे यांनी एका ताऱ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी फेब्रुवारी २०२३ मध्ये अर्ज केला. त्याला महासमितीने मंजूरी दिली आहे. हा तारा आता जगभरातील लोकांना अँड्रॉइड व अॅपल युजर्सना ॲप डाऊनलोड करून पाहता येईल.
द इनोव्हेटिव्ह युनिव्हर्स स्टार फाइंडर थ्रीडी स्मार्टफोन अॅप फॉर अँड्रॉइड अँड आयओएसवरूनही हा तारा पाहता येणार आहे. त्याशिवाय प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग नावाने अॅप डाऊनलोड करून घेता येईल. ॲपमध्ये गेल्यावर रजिस्ट्रीचा CX26529US हा क्रमांक टाकल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव दिसू शकेल. हा तारा space-registry.org या स्पेस संगणक, टॅबवर पाहता येणार आहे. विकिपीडियावरील माहितीनुसार उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या अंदाजे १० हजार ताऱ्यांपैकी आत्तापर्यंत फक्त ३३६ ताऱ्यांना विविध शास्त्रज्ञ, राजकारणी, कलावंतांची नावे दिलेली आहेत. त्यात आता बाबासाहेबांची भर पडणार आहे.
कुणाचीही नावे देता येत नाही
‘‘कुणीही ‘स्टार नेमिंग’ संस्थेशी संपर्क करून आमच्या नातेवाइकांचे नाव ताऱ्याला द्या, असे अजिबात चालत नसते. त्यासाठी विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते. नाव दिले जाणाऱ्या व्यक्तीचे खूप व्यापक काम असावे लागते. आम्ही दीड महिन्यापासून प्रक्रिया करत होतो. त्याला आता कुठे यश आले आहे.’’
- राजू शिंदे, अध्यक्ष, सर्वपक्षीय आंबेडकर जयंती