
गेल्या अनेक वर्षांपासून नियमित सुरू असणारी बोरिवली-मांडवा एसटी बससेवा अचानक बंद करण्यात आली आहे. एस.व्ही रोडमार्गे या बसचा येण्याजाण्याचा प्रवास सुरू होता. मधल्या काळात ही सेवा सुरू असताना उशिराने बस धावण्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. कधी वाहतुककोंडी तर कधी तांत्रिक बिघाडामुळे बस रद्द केल्या जायच्या. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता. मात्र बोरिवली ते मांडवा एसटी बससेवा सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी असल्याने तसेच सुरक्षित असल्याने वाहतूक सेवेत आवश्यक ते बदल करत ही सेवा सुरू ठेवावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने वरील अडचणींचा विचार करत सदर एसटी बस सेवा दोन्ही बाजुकडील प्रवासाकरीता नियमीतपणे एस.व्ही.रोड.मार्गे सुरू ठेवावी, अशी मागणी समाजसेवक सुयोग सुरेश नाईक आणि राजेंद्र दामोदर घरत यांनी केली आहे.