उच्चशिक्षित प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ ;शेती, मजूरी, खासगी शिकवणी करून उदरनिर्वाह

मागील २३ वर्षांच्या कालावधीत काही कर्मचारी हे विनावेतन सेवानिवृत्त झाले, तर कित्येक सेवावृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत.
उच्चशिक्षित प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ
;शेती, मजूरी, खासगी शिकवणी करून उदरनिर्वाह
Published on

मुंबई : राज्य सरकारने २४ नोव्हेंबर २००१ पूर्वीच्या मान्यताप्राप्त महाविद्यालयांना २३ वर्षांपासून विविध प्रकारचे कारणे दाखवून अनुदानापासून दूर ठेवले असल्याने राज्यातील ७८ महाविद्यालयात काम करत असलेल्या उच्चशिक्षित प्राध्यापक व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कित्येक प्राध्यापक हे महाविद्यालयातून घरी आल्यावर हॉटेल - बार, हमाली, शेती, मजूरी, खासगी शिकवणी आदी सारखे वाट्याला येतील ते काम करत आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर २६८ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सरकारने आमचा वनवास संपवून टाकावा, अशी विनंती हे प्राध्यापक करत आहेत.

मागील २३ वर्षांच्या कालावधीत काही कर्मचारी हे विनावेतन सेवानिवृत्त झाले, तर कित्येक सेवावृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. कित्येकांचा मृत्यू झाला, तर कित्येक विविध प्रकारच्या आजाराने त्रस्त आहेत. कित्येकांची मुलं लग्नाला आली आहेत, तर कित्येकांची अजून लग्नच झालेले नाहीत. काहींच्या कडे आपल्या वृद्ध झालेल्या आई-वडिलांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी पैसे नाहीत, तर कित्येकांकडे आपल्या घर कुटुंब चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

महेंद्र कलाल हे शिक्षकेत्तर कर्मचारी असून, ते २००१ पासून आदिवासी धुळे जिल्ह्यातील मोलगी येथील प्रज्ञा महाविद्यालयात विनावेतन काम करतात. त्यांचे वय आज पन्नाशीला येऊन ठेपले आहे. ते महाविद्यालयीन कामानंतर किराणा दुकानात हमालीचे काम करतात. त्यांची ही अवहेलना थांबणार कधी...? त्यांच्या हाताखाली शिक्षण घेत असलेल्या भावी पिढीला न्याय मिळणार कधी...? हे खरे आमचे प्रश्न आहेत. कारण सदरील जवळपास सर्वच महाविद्यालये ही ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी, दुर्गम भागातील आहेत.

आदिनाथ साठे हे ग्रंथालय सहाय्यक म्हणून मागील १५ वर्षांपासून वेळापूर जिल्हा सोलापूर येथील अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयात सहा हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करतात. तेवढ्या पैशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नाही म्हणून मोल मजूरी करतात.

केवळ चार हजार रुपये मानधन

प्रा.डॉ. रामेश्वर वाघचौरे हे पैठण येथील ताराई महाविद्यालयात चार हजार रुपये मानधनात कुटुंब आई -वडील यांचा खर्च भागविण्यासाठी खासगी शिकवणीवर काम करतात, तर बीड दहिफळ वड येथील शाम गदळे महाविद्यालयातील प्रा. डॉ. कृष्णा नागरे हे मागिल चार वर्षांपासून विनावेतन काम करत असून, ते महाविद्यालयीन कामानंतर घरी शेती व शेतमजूर म्हणून काम करत आपला खर्च भागवतात.

logo
marathi.freepressjournal.in