मुंबई : राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. भुसे यांच्या घोषणेनंतर राज्यभरासह विधान सभेत पडसाद उमटले. महाराष्ट्र उज्ज्वल शैक्षणिक परंपरा असून राज्याचे अस्तित्त्व दाखविणारे राज्य मंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही. त्यामुळे राज्य मंडळ सुरुच राहणार असल्याचे दादा भुसे यांनी सोमवारी सभागृहात स्पष्ट केले. तसेच १० वी १२ वी बोर्डाच्या परीक्षेची सर्व जबाबदारी ही राज्य मंडळाकडे असणार आहे. दरम्यान, नव्या शैक्षणिक वेळा पत्रकासंदर्भात भौगलिक परिस्थिती व हवामानानुसार वेळापत्रक निश्चित करण्यात येईल , अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
भुसे यांनी नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात विधानसभेत निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. यावेळी दादा भुसे म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यांच्या आधारे राज्याचे स्वत:चे अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात बदल करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत बनविताना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद याची बनवलेली पाठ्यपुस्तके बालभारती तज्ज्ञ समितीमार्फत अभ्यासून राज्यासाठी स्वत:ची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करुन बनविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुद्यास मंजुरी देण्यापूर्वी तात्कालीन शालेय शिक्षण मंत्री यांनी विविध संघटना प्रतिनिधीसोबत चर्चा केली होती. तज्ज्ञ समितीच्या मदतीने पायाभूत स्तरासाठी अभ्यासक्रम निर्मिती करण्यात आली आहे.
अभ्यासक्रम अंमलबजवणीचे वर्ष व वर्ग पुढील प्रमाणे
२०२५ : पहिली
२०२६ : दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी
२०२७ : पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी
२०२८ : आठवी, दहावी आणि बारावी