महाराष्ट्रात गृहमंत्री पदाचा दर्जा घसरलाय ;खासदार सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

ट्रिपल इंजिन सरकार विकासासाठी महाराष्ट्रात आलं पण आता विकास सोडून सगळं दिसतंय, असा टोलाही सुळे यांनी शिंदे सरकारला लगावला.
महाराष्ट्रात गृहमंत्री पदाचा दर्जा घसरलाय ;खासदार सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

कराड : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून, राज्यात गृह खाते अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अंतरवाली सराटी प्रकरणातही गृहखात्याचे अपयश सिद्ध झाले आहे, या सर्व बाबींवरून राज्यातील गृहमंत्री पदाचा दर्जा घसरलेची स्थिती दिसत आहे. इतकेच काय हे खाते अस्तित्वात आहे कि नाही, अशी शंकाच येते असा थेट निशाणा राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला. कराड येथील स्व.यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, माझ्यावर माझ्या कुटुंबाचे संस्कार झाले, त्यात स्व.यशवंतराव चव्हाणांचा मोठा वाटा आहे. संस्कार काय असतात आणि मराठी संस्कृती काय असते ते चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. आज महाराष्ट्रात २०० आमदारांचं सरकार आहे पण ते स्थिर नाही, त्यात महाराष्ट्राचे नुकसान आहे. महाराष्ट्रासमोर आज सर्वात मोठं आव्हान दुष्काळ आणि पिण्याचे पाणी हे आहे, त्यामध्ये सरकार काही करताना दिसत नाही. ट्रिपल इंजिन सरकार विकासासाठी महाराष्ट्रात आलं पण आता विकास सोडून सगळं दिसतंय, असा टोलाही सुळे यांनी शिंदे सरकारला लगावला.

आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील

मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारला व्यवस्थित हाताळता आला नाही, असं स्पष्ट करून मराठा व इतर समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. त्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं, तर चर्चेला आम्ही तयार आहोत, तसेच त्या अधिवेशनात सरकारने ठोस निर्णय घ्यावा, असंही खा. सुळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in