
सोलापूरमधील शास्त्रीनगर परिसरामध्ये काल (१६ ऑगस्ट) रात्री ११:३० वाजेच्या सुमारास दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. सोलापुरातील सतनाम चौकातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी निवडीची बैठक काल होती. बैठकीनंतर काही कार्यकर्ते चहा पिण्यासाठी शास्त्रीनगर परिसरमध्ये आले. तिथे आल्यानंतर त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दुसऱ्या एका गटानेदेखील घोषणाबाजी चालू केली. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांसमोर आले आणि दगडफेक झाली, अशी प्राथमिक माहिती या प्रकरणात समोर आली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेत पोलिसांनी 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापुरामधील सदर बाजार पोलीस ठाणाच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी तात्काळ गर्दी बाजूला केली. त्यानंतर पोलिसांनी जवळपास 10 लोकांना ताब्यात घेतलं. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती. नेमकं हे का घडलं याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मात्र, अटक केलेल्या आरोपींविरोधात भा.दं.वि.क.147,160,143 ,323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या ठिकाणी पोलिसांचा कटेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.