
एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त दरात शुद्ध पाणी मिळावे म्हणून एसटी महामंडळाने बसस्थानक, आगार याठिकाणी नाथजल पाणीविक्री सुरू केली; मात्र या योजनेवर महामंडळाचे नियंत्रण नसल्याने प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्यांचे सर्रास जादा दर आकारण्यात येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे प्रकार सुरु असून अखेर प्रवाशांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारीनंतर एसटी महामंडळ खडबडून जागे झाले आहे.
प्रशासनाने ठरवून दिलेले दर सर्वत्र आकारण्यात यावे. प्रवाशांची लूट तात्काळ थांबवावी अन्यथा तपासणी दरम्यान कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा एसटी महामंडळाने विक्रेत्यांना दिला आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी सोयीचे वाहतुकीचे साधन म्हणून एसटीला पसंती मिळते. शहरी असो वा ग्रामीण भागात एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. आजच्या घडीला वाहतुकीची विविध साधने उपलब्ध असताना देखील आजही एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये प्रवाशांसाठी स्वस्त दरात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था स्थानकात उपलब्ध केली आहे.
राज्यातील विविध आगारात, बसस्थानकात नाथजल पाणीविक्री सुरू आहे. पण स्टॅाल विक्रेत्यांकडून १५ रुपयांना मिळणारी पाण्याची बाटली २० रुपयांना विकली जात असल्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत. यामुळे प्रवाशांची आर्थिक लुट होत असून सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेल्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जादा पैसे मोजण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून असे प्रकार सुरू असून, प्रवाशांकडून याबाबत अनेकदा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींना एसटी महामंडळाने अखेर गांभीर्याने घेतले असून, महामंडळाच्या नियमाप्रमाणे नाथजल १ लिटर पाणी बॉटलची विकी १५ रुपये तसेच ५०० मि.ली. पाणी बॉटलची विक्री ९ रुपये प्रमाणे करण्याच्या सूचना महामंडळाने दिल्या आहेत.