लोककलेची गळचेपी रोखा! 'तमाशा' बंद केल्या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांविरोधात हायकोर्टात याचिका

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिंपरी-चिंचवडचा अतिरिक्त पदभार सांभाळताना परवानाधारक तमाशाच्या फडाविरुद्ध बेकायदा कारवाई केली व यापुढे तमाशाचा खेळ चालू देणार नसल्याची धमकी दिली, असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.
लोककलेची गळचेपी रोखा! 'तमाशा' बंद केल्या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांविरोधात हायकोर्टात याचिका
Published on

मुंबई : महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमाशाची पोलिसांकडून गळचेपी होत असून तमाशा व्यवसाय बंद केल्यामुळे ९० कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे, असा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिंपरी-चिंचवडचा अतिरिक्त पदभार सांभाळताना परवानाधारक तमाशाच्या फडाविरुद्ध बेकायदा कारवाई केली व यापुढे तमाशाचा खेळ चालू देणार नसल्याची धमकी दिली, असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेची न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत लोककलेची गळचेपी रोखण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

पुणे तालुका खेड कुरूळी येथे उषा काळे यांचे त्रिमूर्ती लोकनाट्य सांस्कृतिक कला व प्रशिक्षण केंद्र आहे. २० जूनला पिंपरी-चिंचवडचे प्रभारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कला केंद्राला भेट दिली. यावेळी वैध परवाना दाखवूनही अमितेश कुमार यांनी व्यवस्थापकाला नोटीस बजावली व दंडाधिकाऱ्यांपुढे हजर राहण्यास सांगितले. तसेच यापुढे तमाशा व्यवसाय करायचा नाही. जर व्यवसाय सुरू ठेवला तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पोलिसांनी दिली. त्याविरोधात उषा काळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in