

पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर बोरघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी संध्याकाळी विचित्र अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका ट्रकने समोरील दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात तीनही ट्रक महामार्गावरच पलटी झाले. या दुर्घटनेत एका ट्रकचा चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोन चालक गंभीर जखमी झाले आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी ५:०५ वाजताच्या पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक (क्रमांक KA.56-2199) वरील चालकाचे नियंत्रण सुटले. या ट्रकने त्याच्या समोर चालणाऱ्या ट्रक (क्रमांक RJ-19-GG-4175) आणि कंटेनर ट्रक (क्रमांक MH.04-GR-2874) यांना पाठीमागून अत्यंत जोरदार धडक दिली. या धडकेत तिन्ही ट्रक महामार्गावरच पलटी झाले.
अपघातग्रस्त वाहनांमध्ये रंगाचे डब्बे आणि केमिकल पावडरच्या बॅगा भरलेल्या होत्या. ट्रक पलटी झाल्यामुळे हा सर्व माल रस्त्यावर सांडला आणि रंगाचा थर महामार्गावर पसरल्याने मुंबईकडे जाणाऱ्या चारही लेनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या भीषण अपघातात धडक देणाऱ्या पहिल्या ट्रकचा चालक आणि क्लिनर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तींची नावे आणि पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. तसेच, दुसऱ्या ट्रकचा चालक वीर बळराम (रा. राजस्थान) आणि कंटेनर ट्रकचा चालक जिशान अली (वय ३१, रा. उत्तर प्रदेश) हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
बोरघाट महामार्ग पोलीस आणि खोपोली पोलीस स्टेशनचे पथक १० मिनिटांत घटनास्थळी हजर झाले. खालापूर विभागाचे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल, खोपोलीचे पोलीस निरीक्षक श्री. हिरे, आणि बोरघाट महामार्ग पोलिसांचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी तातडीने मदतकार्याची सूत्रे हाती घेतली. आयआरबी कंपनीची पेट्रोलिंग टीम, 'देवदूत' यंत्रणा आणि खोपोलीतील सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू
जखमी चालकांना तातडीने उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृत चालक व क्लिनर यांचे मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी खोपोली पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.